Buldhana News : डोळ्यांदेखत कोळसा ! बुलडाण्यात गर्भवती पत्नीचा पतीसमोरच होरपळून मृत्यू

​​​​​​​Buldhana Car Fire Accident: काही दिवसांतच आपल्या चिमुकल्याचं स्वागत करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या एका दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Buldhana Car Fire Accident: संभाजीनगर ते जळगाव या महामार्गावर पहूर गावाजवळ हा भीषण अपघात झाला
बुलडाणा:

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana Car Fire Accident: काही दिवसांतच आपल्या चिमुकल्याचं स्वागत करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या एका दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. पोटात वाढणारं बाळ जगात येणार नाही आणि आपणही जगाचा निरोप घेऊ, याची कल्पनाही त्या गर्भवती महिलेने केली नसेल. असाच काहीसा मन हेलावून टाकणारा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कुलामखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका 6 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कार अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे.

पतीने डोळ्यांदेखत पत्नीला गमावले

संभाजीनगर ते जळगाव या महामार्गावर पहूर गावाजवळ हा भीषण अपघात झाला. मृत महिलेचे नाव जानव्ही संग्राम मोरे (राजपूत), वय 21 वर्षे, असे आहे. जानवी ही 6 महिन्यांची गर्भवती होती.

भुसावळ तालुक्यातील बोर्डी येथील माहेरहून जानव्हीला घेऊन तिचे पती संग्राम मोरे हे कारमधून परत येत होते. पहूर-अजिंठा मार्गावर असताना कारचे टायर अचानक फुटले. त्यामुळे संग्राम यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरला धडकली.

हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर कारने लगेच पेट घेतला. अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. नागरिकांनी कारची काच फोडून संग्राम मोरे यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, घाईगडबडीत कारमध्ये आणखी कोणी आहे का, याचे भान कोणालाच राहिले नाही.

Advertisement

( नक्की वाचा : Akola News : अकोला महापालिकेच्या नावाने मेसेज; 10 रुपये भरले आणि महिलेचं बँक खातं रिकामं! काय आहे प्रकरण? )

संग्राम यांनी जेव्हा कारमध्ये आपली पत्नी असल्याचे सांगितले, तेव्हा नागरिकांनी तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या प्रयत्नांना यश आले नाही आणि संग्राम यांच्या डोळ्यांदेखतच त्यांची 6 महिन्यांची गर्भवती पत्नी जानवी हिने अखेरचा श्वास घेतला. अक्षरशः त्यांचा डोळ्यांदेखत कोळसा झाला. गर्भवती पत्नीला पेटलेल्या कारमध्ये होरपळताना पाहणं, हा नियतीचा क्रूर डाव म्हणावा लागेल.

महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले, काय काळजी घ्याल?

सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये रस्ते गुळगुळीत आणि चांगल्या दर्जाचे झाले आहेत, त्यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा राहिलेली नाही. रस्ते चांगले असल्यामुळे अनेकदा वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

Advertisement

या घटनेतून महत्त्वाचा धडा मिळतो की, वाहन चालवताना वेगावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, मुख्यतः चारचाकी वाहनांचे टायर वारंवार तपासून घेणे आवश्यक आहे. अति उष्णता आणि घर्षणांमुळे अशा प्रकारचे अपघात घडल्याचे यापूर्वीही निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या वाहनाची आणि विशेषत: टायर्सची तपासणी करणे आवश्यक आहे.