- पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी १९२९ मध्ये सत्याग्रह केला होता
- त्या सार्वजनिक विहिरीवर बाबासाहेबांनी पाणी शेंदले आणि ती विहीर सर्वांसाठी खुली केली होती
- भीम जयंती उत्सवात विविध जाती-धर्मांचे लोक एकत्र येऊन सामाजिक एकतेचा संदेश दिला गेला
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्याच्या सामाजिक इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथे भीम जयंती उत्साहात साजरी झाली. 29 मे 1929 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी अस्पृश्यता निवारणाचा मोठा संदेश दिला होता. ज्या सार्वजनिक विहिरीवर बाबासाहेबांनी सत्याग्रह करून पाणी शेंदले होते, त्या विहिरीला आज फुलांनी सजवून अभिवादन करण्यात आले. गावातील सर्वधर्मीयांच्या सहभागाने हा सोहळा सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला. याच गावात बाबासाहेब एका जिल्हा परिषदेच्या शाळेत थांबले होते. त्या शाळेतील खोलीलाही यावेळी वंदन करण्यात आले. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी एकत्र येत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.
पातुर्डा गावाचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी अतूट जोडलेला आहे. 1929 पूर्वी या गावातील सार्वजनिक विहीर दलितांसाठी खुली नव्हती. ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी 29 मे 1929 रोजी बाबासाहेबांनी येथे 'मध्यप्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषद' आयोजित केली होती. या ऐतिहासिक दिनी बाबासाहेबांनी स्वतः विहिरीवर जाऊन पाणी शेंदले आणि ते समाजाला पाजले. या एका कृतीने वर्षानुवर्षांची गुलामगिरीची साखळी तोडून ती विहीर सर्वांसाठी खुली केली. या गावातील दलितांना बाबासाहेबांमुळे हक्काचे पाणी मिळालं. त्याची आठवण आज ही या गावातील लोकांनी ठेवली आहे.
जयंतीनिमित्त गावकऱ्यांनी ज्या विहिरीतून बाबासाहेबांनी पाणी काढले होते, त्या विहिरीचे विधीवत पूजन केले. या आंदोलनासाठी बाबासाहेब या गावी आले होते. त्यावेळी ते गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वास्तव्यास होते. ज्या जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोलीत बाबासाहेबांनी मुक्काम केला होता, त्या खोलीचेही पूजन करण्यात आलं. यावेळी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. दरवर्षी या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यासह परिसरातून हजारो भीम अनुयायी पातुर्डा येथे दाखल होतात.
यावेळी भीम अनुयायांसह विविध सामाजिक स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. "हा केवळ उत्सव नसून आमच्यासाठी एक प्रेरणा सोहळा आहे," अशा भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे भीम जयंतीचा उत्साह काही वेगळाच असतो. तो या वर्षी ही दिसून आला. निळ्या रंगाच्या पताका आणि बाबासाहेबांच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमले होते. जिल्हा परिषद शाळेतील ज्या खोलीत बाबासाहेबांनी मुक्काम केला होता, तिथे जाऊन अनेकांनी नतमस्तक होत अभिवादन केले. सर्व जाती-धर्माचे लोक या सोहळ्यात सहभागी झाल्याने उत्साहाचे वातावरण होते.