- बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबत फळबाग व भाजीपाला वर्गीय पिकांकडे वळत आहेत मात्र भाव मिळत नाही
- नांद्राकोळी येथील शेतकरी शिवाजी तायडे यांनी अर्धा एकरवर टोमॅटो लागवड केली त्याला योग्य बाजारभाव मिळाले नाहीत
- टोमॅटो पीक चांगले आले तरीही बाजारात नेण्याचा खर्च व भाव न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे
अमोल सराफ
शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात काबाड कष्ट करत असतो. नव नवीन पिक घेवून चार पैसे मिळतील अशी त्याची अपेक्षा आहे. त्यासाठी तो मेहनत करतो. लेकरा प्रमाणे पिक मोठं करतो. त्यातून उत्पन्न घेतो. पण ज्या वेळी मालाला भावच मिळत नाही त्यावेळी त्याची अवस्था पावसाने झोडपलं अन् राजाने मारलं तर कुणाकडे जावं असी होते. त्यावेळी त्याच्या समोर काहीच पर्याय राहत नाहीत. अशीच काहीशी स्थिती बुलढाणा जिल्ह्यातील शिवाजी तायडे या शेतकऱ्याची झाली आहे. त्यांची कहाणी ऐकली तर तुमच्या डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहाणार नाही. जगाचा पोशिंदा असलेला या बळीराजावर अशी वेळ आली हे पाहूनच मनाला चटका लागेल.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकासोबतच फळबाग व भाजीपाला वर्गीय पिक घेण्याकडे वळताना दिसत आहे. मात्र पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. असेच काहीसे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. असंच काहीसं घडलं आहे बुलढाण्याच्या नांद्राकोळी येथील शेतकरी शिवाजी तायडे यांच्या सोबत. त्यांची नांद्राकोळी या गावात दोन एकर शेती आहे. ते मेहनतीने इथं शेती करतात. या दोन एकर पैकी त्यांनीअर्धा एकर क्षेत्रफळामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी अर्धा एकरवर टॉमेटो लावला होता. पिकाची काळजी ही घेतली. पिक ही चांगलं आलं.
पण हे करत असताना त्यांना आतापर्यंत जवळपास 50 हजार रुपये खर्च आला. पिक चांगलं आल्यामुळे केलेला खर्च वसूल होईल अशी त्यांना आपेक्षा होती. आता टोमॅटो पीक काढणीला आलं आहे. पण या टॉमेटोला योग्य भाव मिळत नाही. त्याच बरोबर टोमॅटो बाजारात नेण्याचा खर्चही शेतकऱ्यांचा निघत नाही अशी स्थिती आहे. अशा वेळी काय करावे असा प्रश्न शिवाजी तायडे यांना पडला होता. त्यामुळे ते हताश झाले आहेत. या तूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. ज्या हातांनी हे टॉमेटोचे पिक त्यांनी वाढवले. त्याला जपले. तेच टॉमेटो त्यांनी जनावरांपुढे खाण्यास टाकले. या शिवाय त्यांच्या समोर दुसरा पर्यायच नव्हता असं ते सांगतात.
टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेचा झाला लाल चिखल झाला असचं म्हणावं लागेल. टॉमेटो तर हातून गेले. पण त्यासाठी झालेल्या खर्चाचे काय हा प्रश्न आता तायडे यांनी सतावत आहे. कर्ज घेवून त्यांनी टॉमेटो लावले होते. पण त्याला भावच मिळाला नाही. कवडी मोल विकण्या पेक्षा त्यांनी तो जनावरांना खावू घातले. एकातून सुटका झाली पण दुसऱ्या चक्रात ते अडकले. आता कर्जाचा डोंगर उभा राहाणार. त्यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार त्यांनी आता सुरू केला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नशिबी अशीच काहीशी स्थिती असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पिकाला योग्य भाव मिळण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world