अमोल गावंडे, बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पात खडकपूर्णा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या युवा शेतकऱ्याने शासनाच्या दुर्लक्षपणामुळे आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना 13 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. मृतक शेतकऱ्याच्या कपड्यात सुसाईड नोट आढळून आली. यामध्ये त्याने, शासन आत्महत्येस कारणीभूत असल्याचे नमूद केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पासमोर डिसेंबर महिन्यात त्यानंतर, पुन्हा एकदा जानेवारी मध्ये मृतक युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते. अंढेरा मंडळात दुष्काळाचे सावट असून शेतकऱ्यांना अतिशय हाल सोसावे लागत असल्याने, यंदा ओव्हरफ्लो झालेल्या खडकपूर्णा प्रकल्पातून कालव्याद्वारे अंढेरा मंडळातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावे, अशी आर्त मागणी त्यांनी लावून धरली होती.
त्यांच्या उपोषणानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. मात्र, अनेक दिवस उलटल्यानंतर ही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त झाला. यातूनच कैलास नागरे यांनी टोकाचे पाऊल उचलले. विषारी औषध प्राशन करून त्यांनी स्वतःला संपविले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत, मात्र पाणी नाही. केळी, पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा आणि राख आनंदस्वामी धरणात टाका. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावे. माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो. स्वतः शून्य झालो, असे त्यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.
(नक्की वाचा - Maharashtra BJP : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाची यादी ठरली! अनुभवी नेत्याला पहिल्यांदाच संधी?)
दरम्यान, या घटनेनंतर शिवनी आरमाळ येथील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत स्व. नागरे यांच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत, नागरे यांचा मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका शिवणी आरमाळ येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील गावामध्ये दाखल झाले आहेत.