अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana News : बुलढाण्यातील मेहकरच्या सार्वजनिक अभ्यासिकेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी अचानक धडक देत विद्यार्थ्यांच्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. पिण्याचे पाणी, स्वच्छता, संदर्भ पुस्तके आणि आसनव्यवस्थेतील उणिवांवर त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले.
थेट अभ्यासिकेत शिरले, अधिकाऱ्यांना धारेवर धरले...
मेहकर नगरपरिषदेच्या सार्वजनिक अभ्यासिकेत सुमारे १५० विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अभ्यासिकेला भेट दिली. यावेळी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छता, आसनव्यवस्था आणि संदर्भ पुस्तकांची पाहणी करत अनेक त्रुटी निदर्शनास आणल्या. अपुऱ्या सुविधा तातडीने सुधारण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. स्वच्छतागृहांची क्षमता वाढवणे आणि अद्ययावत स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाल्याच पाहिजेत, यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्पष्ट केले.