आईविना भुकेनं ओक्साबोक्शी रडणारं बाळ, महिला पोलिसाचा पान्हा फुटला; स्वत:चं दूध पाजून केलं शांत!

या महिला कर्मचाऱ्याने केलेल्या या कार्यामुळे तिचं कौतुक तर होतच आहे. मात्र या प्रकारामुळे खाकीमधली 'ममता' देखील सर्वांसमोर आलीये.

Advertisement
Read Time: 3 mins
बुलढाणा:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

'सद रक्षणाय, खल निग्रहणाय' हे घोषवाक्य  मनात ठेवून लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी घालून आपले कर्तव्य पार पाडत असतात, कधी-कधी पोलिसांना 'पोलिसी खाक्या' दाखवावा  लागतो. मात्र या खाकीमध्येही शेवटी एक मनुष्य असून या खाकीत एक वडिलाचं प्रेम, एका आईची 'ममता' लपलेली असते. याचा प्रत्यय बुलढाण्यातून समोर आलाय. एका दिवसाची भुकेली अनोळख्या चिमुकलीला बुलढाणा शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने चक्क आपलं दूध पाजून त्या चिमुकलीला शांत करून त्याची भूक भागवलीये. या महिला कर्मचाऱ्याने केलेल्या या कार्यामुळे तिचं कौतुक तर होतच आहे. मात्र या प्रकारामुळे खाकीमधली 'ममता' देखील सर्वांसमोर आलीये. एका दिवसाच्या भुकेली चिमुकलीला स्वतःचं दूध पाजणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याचे नाव योगिता शिवाजी डुकरे असं आहे. त्या बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

लोणार येथून एका व्यक्तीने 3 सप्टेंबर रोजी एका दिवसाच्या चिमुकलीला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात सोडण्यासाठी आणले होते. अनाथ आश्रमात घेण्यापूर्वी व्यवस्थापनाने त्याला पोलिसांत तक्रार नोंदवण्यास सांगितले. ती व्यक्ती चिमुकलीला घेऊन त्याच दिवशी रात्रीच्या आठ ते साडे आठ वाजेच्या दरम्यान बुलढाणा शहर पोलिसात तक्रार द्यायला पोहचली होती. ही चिमुकली एका वेड्या बाईची असल्याचं सांगून तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. त्यामुळे या चिमुरडीला अनाथ आश्रमात सोडण्यासाठी आणल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.

सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली या व्यक्तीकडे असल्याने ती उपाशी होती. काही वेळाने ते एक दिवसाचं बाळ ओक्साबोक्शी रडू लागलं. त्याच वेळी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात  कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी चिमुकलीला रडतांना पाहताय त्यांच्यामधील 'ममता' जागृत झाली. चिमुरडी उपाशी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी लगेच परवानगीने या अनोळखी एक दिवसाच्या चिमुकलीला स्वतःचा दूध पाजून शांत केलं. विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांना एक ते दीड वर्षाचं बाळ असल्याने त्यांना ती चिमुकली उपाशी असल्याचं लक्षात आलं होतं.

दरम्यान बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी त्या चिमुकली बाबत तपास केला असता ज्या व्यक्तीने त्या चिमुकलीला आश्रमात आणलं होतं, त्याच्याच सोळा वर्षांच्या मुलीच्या पोटी तिचा जन्म झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध लोणार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या चिमुकलीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या चिमुकलीची प्रकृती चांगली असून तिचं वजन कमी असल्यामुळे तिला तीन आठवड्यापर्यंत रुग्णालयातच ठेवून उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे.

नक्की वाचा - 10 वर्षांची प्रतीक्षा, बाळाचं बारसं, आनंद...अन् मद्यधुंद तरुण; घटनास्थळाचे CCTV फुटेज आले समोर

दरम्यान आ.संजय गायकवाड यांनी अनोळखी भुकेल्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजणाऱ्या त्या पोलीस महिला कर्मचाऱ्याचे शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. कशाची ही पर्वा न करता एका दिवसाच्या भुकेली चिमुकलीला महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनी स्वतःचं दूध पाजल्याने महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. शिवाय स्तनपान कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांना ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवडले गेले तर अन्य महिला देखील योगिता डुकरे सारखे निसंकोजपणे आपल्या बाळाला स्तनपान करतील, अशी भावना व्यक्त केली जात आहे.