विशाल पुजारी, प्रतिनिधी
माणसाच्या जीवनात मुक्या प्राण्यांचं वेगळच स्थान असतं. विशेषतः बैल हा फक्त शेतीसाठी उपयुक्त जनावर नसून त्याचं अस्तित्व माणसाशी भावनिकदृष्ट्या जोडलेलं आहे. आपल्या प्रत्येक श्रमात, प्रत्येक यशात, माणसाला सोबत करणाऱ्या या बैलाशी त्याचं नातं केवळ मालक-जनावर असं नसतं. तर तो कुटुंबाचा अविभाज्य भाग असतो. याचीच प्रचिती कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील रामपूर या गावात दिसून आली. या गावातील सुहास वर्पे यांच्या बैलाच्या निधनाने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील विविध गावात भरलेल्या बैलगाडा शर्यतीत ज्याने आपले वर्चस्व कायम राखले आणि ज्याने आपल्या बरोबरच आपल्या मालकाचे नाव दोन राज्यात गाजवले असा 'लक्ष्या' नावाच्या बैलाने वृद्धपकाळात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर असंख्य बैलगाडा शर्यत प्रेमी त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. ज्याने आपल्या गावचे नाव दोन राज्यात झळकवले त्या बैलाच्या प्रेमापोटी सारा गाव दुःखात बुडाला. लक्ष्याने महाराष्ट्रासह कर्नाटकातही बैलगाडा शर्यतीत मोठं नाव कमावलं होतं. लक्ष्याच्या निधनाने त्याला मालकावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लक्ष्या हा चंदगड तालुक्यातील रामपूर या गावातील बैल. लक्ष्याने बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठं नाव कमावलं होतं. सुहास वर्फे हे लक्ष्याला जीवापाड जपत होते. लक्ष्याने अनेक शर्यत स्पर्धा गाजवल्या होत्या. मात्र वृद्धापकाळाने त्याचं निधन झालं, यानंतर गावातून शोक व्यक्त केला जात आहे.