Chandrapur News: ससे आणि उंदरांमुळे फुटला कालवा? सिंचन विभागाच्या अजब अहवालाने उडाली खळबळ

Chandrapur Canal Burst News: चंद्रपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्याला पाणी सोडल्याच्या पहिल्याच दिवशी मोठे भगदाड पडले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Chandrapur Canal Burst News: पाणी सोडताच पाण्याचा दाब वाढला आणि...
चंद्रपूर:

Chandrapur Canal Burst News: चंद्रपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्याला पाणी सोडल्याच्या पहिल्याच दिवशी मोठे भगदाड पडले आहे. विशेष म्हणजे, ससे आणि उंदरांनी केलेल्या बिळांमुळे कालव्याची भिंत कमकुवत झाली आणि पाण्याचा दाब सहन न झाल्याने कालवा फुटल्याचा अजब प्राथमिक अहवाल सिंचन विभागाने दिला आहे. तब्बल 16 वर्षांपासून सिंचनाच्या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांची प्रतीक्षा यामुळे अद्याप अपूर्णच राहिली आहे.

पहिल्याच दिवशी फुटला कालवा, शेती पाण्याखाली

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी घोडाझरी कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही वेळातच चंद्रपूर जिल्ह्यातील ओवाळा गावाजवळ कालव्याला मोठे भगदाड पडले. कालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी थेट परिसरातील शेतांमध्ये शिरले आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे 2010 मध्ये बांधण्यात आलेला हा उपकालवा आणि मुख्य कालव्याचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. त्यामुळे अनेक वर्षे हा भाग वापराविना पडून होता.

Advertisement

( नक्की वाचा : Shegaon News: शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर मोठी कारवाई, FDA चा गंभीर इशारा )

सिंचन विभागाच्या अहवालात नेमके काय?

दीर्घकाळ वापर नसल्याने मातीच्या कालव्यात ससे आणि उंदरांनी मोठ्या प्रमाणात बिळे केली होती, असा दावा सिंचन विभागाने आपल्या अहवालात केला आहे. तपासणीदरम्यान ही बिळे कालव्याच्या बांधातून थेट आरपार गेल्याचे दिसून आले. यामुळे कालव्याची आतली रचना पोकळ आणि कमकुवत झाली होती. पाणी सोडताच पाण्याचा दाब वाढला आणि ही बिळे अधिक रुंद होऊन कालवा फुटल्याचा निष्कर्ष विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या (VIDC) प्राथमिक अहवालात काढण्यात आला आहे.

घोडाझरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुहास मोरे यांनीही ससे आणि उंदरांच्या बिळांमुळेच हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली असून, या संदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले आहे. तपासणी पथकातील एका अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात सोडलेले पाणी ही केवळ एक चाचणी होती आणि अशा संभाव्य अडचणींचा अंदाज प्रशासनाला आधीपासून होता.

( नक्की वाचा : Vande Bharat : मराठवाड्यातील 'या' रेल्वे मार्गावर धावणार वंदे भारत? केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी )
 

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

सध्या फुटलेल्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुढील 2 दिवसांत दुरुस्ती पूर्ण करून कालव्यात पुन्हा पाणी सोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, एकदा नियमित पाणी सुरू झाले की ससे आणि उंदरांना पुन्हा बिळे करण्याची संधी मिळणार नाही. हा कालवा पुन्हा सुरळीत सुरू झाल्यास ब्रह्मपुरी, सिंदेवाही आणि नागभीड तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, या कालव्याच्या बांधकामात सुरुवातीपासूनच अनेक तांत्रिक अडथळे आले होते, ज्यामध्ये कालव्याच्या मार्गात येणारा रेल्वे मार्ग हा एक मुख्य अडथळा ठरला होता. मात्र, 16 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पाणी सोडल्यावर थेट ससे आणि उंदरांवर खापर फोडणाऱ्या या अहवालावर आता शेतकरी आणि नागरिकांमधून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article