जाहिरात

Shegaon News: शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर मोठी कारवाई, FDA चा गंभीर इशारा

Shegaon Pedha FDA Action : श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे एका धक्कादायक अहवालातून उघडकीस आले आहे.

Shegaon News: शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर मोठी कारवाई, FDA चा गंभीर इशारा
Shegaon Pedha FDA Action : हे पेढे अत्यंत निकृष्ट आणि भेसळयुक्त असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
शेगाव:

अमोल सराफ, प्रतिनिधी

Shegaon Pedha FDA Action : श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे एका धक्कादायक अहवालातून उघडकीस आले आहे. शेगाव मंदिर परिसरातील एका प्रसिद्ध विक्रेत्याचे पेढ्याचे नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत थेट नापास ठरले आहेत. भाविकांनी प्रसाद म्हणून विश्वासाने खरेदी केलेल्या पेढ्यांमध्ये पामतेल आणि हानिकारक कृत्रिम रंगांची भेसळ आढळल्याने प्रशासनाने आता संबंधित दुकानदाराविरुद्ध थेट न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

काय आहे प्रकरण?

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार बुलढाण्याचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली 27 जून रोजी एफडीएच्या पथकाने शेगाव मंदिर परिसरातील प्रमुख पेढा विक्री केंद्रांवर अचानक छापे टाकले होते. भाविकांकडून मिळणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत विविध दुकानांमधून पेढ्यांचे नमुने गोळा करून ते नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

Latest and Breaking News on NDTV

नुकत्याच प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार, पेढा विक्रेते नारायण नागलकर यांच्या दुकानातील 2 नमुने पूर्णपणे नापास घोषित करण्यात आले आहेत. या पेढ्यांमध्ये पाम तेलाचा गैरवापर आणि आरोग्याला अपायकारक कृत्रिम रंगांची मिसळ केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे पेढे अत्यंत निकृष्ट आणि भेसळयुक्त असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : DMart मध्ये 'किडलेला' कारभार! सॉफ्टी आईस्क्रीममध्ये थेट जिवंत किडा, थेट Tukram Mundhe कडे पोहोचली तक्रार )

काय होणार कारवाई?

नागपूर प्रयोगशाळेचा अहवाल समोर आल्यानंतर एफडीए प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अहवालाच्या आधारे संबंधित भेसळयुक्त पेढा विक्रेत्याविरुद्ध लवकरच न्यायालयात खटला दाखल केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली आहे. 27 जून रोजी झालेल्या या धडक कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, अक्षय भोपाळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा ताफा सहभागी झाला होता.

Latest and Breaking News on NDTV

मंदिर परिसरातील 4 ते 5 मुख्य दुकानांवर एकाच वेळी कारवाई करत 3 ठिकाणांहून पेढ्यांचे नमुने जप्त करण्यात आले होते. त्यातील 2 नमुने थेट नापास ठरल्याने शेगावमधील पेढा विक्रेत्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

( नक्की वाचा : Dental Care Tips: महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही! 'या' सोप्या उपायाने तुमचे पिवळे दात होतील पांढरेशुभ्र )
 

कचोरीच्या अहवालाची प्रतीक्षा 

पेढ्यांसोबतच मंदिर परिसरातील प्रसिद्ध कचोरीच्या दुकानांमधूनही काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, कचोरीचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल हाती आल्यानंतर आवश्यक ती पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांवर यापुढेही अशीच कठोर आणि धडक कारवाई सुरू राहील, असा सडेतोड इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com