अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर:
Chandrapur Fraud News: माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, धुनीची पावडर पाण्यात टाकून प्यायल्यास आणि हे तावीज वापरल्यास तुझे आजारी पती पूर्ण बरे होतील, अन् घरातील पैसेही डबल होतील. अशा अजब-गजब आणि भुलथापांच्या जाळ्यात ओढून एका कुटुंबाला तब्बल २५ लाख ९० हजार रुपयांना लुटणाऱ्या तीन ठग महिलांचा चंद्रपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंधश्रद्धेचा भयानक खेळ मांडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने हडपणाऱ्या या तिन्ही महिलांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे. विद्या विठ्ठलराव निमजे, शाहिस्ता अंजुम मोहम्मद शकील शेख आणि शबनम अशी अटक करण्यात आलेल्या भोंदू महिलांची नावे आहेत.
भोंदूगिरीने २५ लाखांचा गंडा..
चंद्रपूर जोड देऊळ पठाणपुरा वॉर्डातील तक्रारदार वैशाली अनिल खणके यांची जमीन इराई नदीच्या पुलासाठी संपादित झाली होती. त्याचे भरपाई म्हणून ७१ लाख रुपये त्यांना मिळाले होते. पती आजारी असल्याने वैशालीच घरातील सर्व व्यवहार पाहत असत. दरम्यान, शेजारीच भाड्याने राहण्यास आलेल्या विद्या निमजे हिची वैशालीशी ओळख झाली. वैशाली यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत विद्याने त्यांच्या मनात भ्रमाचे जाळे विणण्यास सुरुवात केली. तुझ्या पतीला मी पूर्ण बरे करते, असे सांगत सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपये उकळले.
त्यानंतर हप्त्या-हप्त्याने ५ लाख २५ हजार रुपये चेकमध्ये भरून काढून घेतले. दरम्यान भोंदू महिलेची भूक एवढ्यावरच थांबली नाही. ती नेहमी घरी यायची आणि धुनीची पावडर तसेच ही चिट्टी पाण्यात टाकून प्या, प्रकृती छान होईल" असा भास निर्माण करायची. जुलैच्या पहिल्या आठवड्यात "घराचे कल्याण होईल" असे सांगून कानातील सोन्याचे टॉप्स आणि गळ्यातील पोत काढून घेतले. त्यानंतर वैशाली यांना बँकेत नेऊन १० लाख रुपये रोख काढायला लावले आणि ते स्वतःकडे घेतले.
Maharashtra Rain: सावधान! राज्यभर तुफान पाऊस बरसणार, 'या' तारखा लक्षात ठेवा; प्रशासन अलर्ट
तीन महिलांना अटक
दुसऱ्याच दिवशी पुन्हा घरी येऊन "घर खरेदीसाठी" ठेवलेले आणखी १० लाख रुपये घेऊन ती पसार झाली. हडपलेल्या रोकडमधील काही रक्कम तिने शाहिस्ता अंजुम आणि शबनम यांच्याकडे दिली होती. परंतु, कुठलाही फायदा झाला नसल्याने त्यांनी पैसे परत मागितले. मात्र "माझ्याकडे पैसे नाहीत, खर्च झाले" अशी उडवाउडवीची उत्तरे तिने दिल्याने फसवणूक झाल्याचे उघडकीस येताच त्यांनी शहर पोलिसांत तक्रार करताच त्या तिघांवर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक गुन्हा नोंदवून तिन्ही महिलांना तत्काळ अटक केली. त्यांच्याकडून तावीज आणि अंधश्रद्धेसाठी वापरलेले इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास चंद्रपूर पोलीस निरीक्षक करत आहेत.