किशोर बेलसरे, नाशिक
शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्यावरुन राजकारण तापलं आहे. याचा निषेध म्हणून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळे येथे आंदोलन केले. मात्र आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांनी चुकून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याने विरोधक चांगले आक्रमक झाले. महायुतीकडून राज्यभर आव्हाडांविरोधात आंदोलन केलं जात आहे. अशात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाडांचा पाठराखण करत महायुतीच्या आंदोलनाची हवा काढली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनुस्मृतीला सगळ्यांचाच विरोध आहे. महिलांबाबत घाणेरडे लिखाण, शिक्षणाचे अधिकार नाही. खूप काही लिखाण आहे, त्यावर आक्षेप आहे. अनेक लेखकांनी याचा निषेध केला आहे. अचानक हे सगळं घडतंय याच्या पाठीमागे काय चाललंय हे शोधलं पाहिजे. मंत्री दीपक केसरकर याची भलाभल करतात याचं मला विशेष वाटलं, आम्ही त्याचा विरोध करतो, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
(नक्की वाचा: प्रवाशांनो हे लक्षात ठेवा! मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा मेगाब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द)
पाहा व्हिडीओ
जितेंद्र आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला यावर बोलताना ते म्हणाले की, त्यांची भावना चांगली होती. चुकून त्यांनी बाबासाहेबांचा फोटो असलेले पोस्टर फाडले. सगळ्यांनी त्याचे अनुकरण केले. पण त्यांनी माफी मागितली आहे. विरोधी पक्षाचे म्हणून टीका करणार. पण मनुस्मृतीवरील फोकस कमी व्हावा म्हणून आव्हाड आव्हाड करू नका. मनुस्मृतीचा चंचू प्रवेश अभ्यासात नको, अशी ठाम भूमिक छगन भुजबळ यांनी घेतली.
(वाचा - करायला गेले एक आणि.... जितेंद्र आव्हाडांना माफी का मागावी लागली?)
जितेंद्र आव्हाडांनी मानले आभार
भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर , आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, छगन भुजबळसाहेब! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहित आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने मी आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.