मंगेश जोशी, जळगाव
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी बेपत्ता झालेल्या गव्हाणे यांचा मृतदेह आज सकाळी चाळीसगाव जवळील कन्नड घाटात हातपाय बांधलेल्या अवस्थेत खोल दरीत मिळून आला.
घटनेचा सविस्तर तपशील
तुकाराम गव्हाणे हे शनिवारी सायंकाळी उंडणगाव येथे मक्याचे पैसे घेण्यासाठी गेले होते. तिथून पैसे घेऊन दुचाकीने परतत असताना वाटेतच त्यांचे अपहरण करण्यात आले. मध्यरात्री गव्हाणे यांच्याच मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन आला. अपहरणकर्त्यांनी वडिलांच्या सुटकेसाठी 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या फोनमुळे गव्हाणे कुटुंबीय हादरून गेले.
(नक्की वाचा- Pune Traffic: भीमा-कोरेगाव शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज, बुधवारपासून वाहतुकीत मोठे बदल, चेक करा पर्यायी मार्ग)
मुलाने तातडीने अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, आज सकाळी कन्नड घाटात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तिथे शोध घेतला असता एका खोल दरीत गव्हाणे यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला.
पोलिसांची कारवाई आणि तपास
कन्नड पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने हालचाली करत 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत, आरोपींनी गव्हाणे यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह दरीत फेकल्याची कबुली दिली आहे. दरी अत्यंत खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठे परिश्रम घ्यावे लागले.
(नक्की वाचा- Kalyan News: विरार-अलिबाग कॉरिडॉरचा म्हाडाला फटका! कल्याणमधील गृहप्रकल्पाच्या जमिनीतून जाणार रस्ता)
शेतकरी कुटुंबाला अशा प्रकारे टार्गेट करून त्यांची हत्या केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस आता या टोळीत अजून कोणाचा समावेश आहे का, याचा कसून तपास करत आहेत.