सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस आहेत. आपल्या अवतीभोवती लग्नाची गडबड सुरु आहे. अनेकांना त्यांचा जीवनसाथी मिळतोय. नवे संसार सुरु होत आहेत. लग्नाच्या वेळी कन्यादान हा एक महत्त्वाचा विधी असतो. वडिल आणि मुलीच्या पवित्र, भावनिक आणि तितक्याच हळव्या नात्यामध्ये कन्यादान हा महत्त्वाचा क्षण आहे. कन्यादान करण्याचं पुण्य मिळालं की प्रत्येक वडिलांना आपल्या आयुष्यात कृतार्थतेची भावना दाटून येतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्या मुलींना आई-बाप नाहीत. ज्या अनाथालयात वाढल्या आहेत, त्यांचं कन्यादान कोण करणार? हा प्रश्न त्यांना सतावत असतो. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पुढाकार घेत एका मुलीचा हा प्रश्न सोडावला. या लग्नाची सध्या संभाजीनगरमध्ये सर्वत्र चर्चा सुरु आहे.
शासकीय सावित्रीबाई महिला हिला राज्यगृहात राहणाऱ्या पूजाचे अण्णासाहेब सातपुतेशी लग्न झाले. संभाजीनगरमधील गोपीनाथ मुंडे भवनात झालेल्या या लग्नात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कन्यादान केले. त्यांच्या पत्नी करुणा स्वामी देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
( नक्की वाचा : Ladki Bahin Scheme : किती बहिणींना झाला फायदा, सरकारचे किती पैसे खर्च? पहिल्यांदाच आकडा उघड! )
कसं झालं लग्न?
या लग्नातील 'वर' अण्णासाहेब सातपुते जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार नोंदणी केंद्रात व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत आहेत. तर 'वधू' फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मुलगा आणि मुलीची एकमेकांना पसंती, तसंच स्थानिक व्यवस्थापन समितीनं सर्व माहिती घेतल्यानंतर या लग्नाला परवानगी दिली. त्यानंतर विधीवत हे लग्न पार पडले. ‘मला आता हक्काचे कुटुंब मिळाले आहे. या क्षणी मी अतिशय आनंदी आहे,' अशी भावना पूजाने व्यक्त केली.
अनाथ मुलींना सक्षम आणि सुरक्षित आयुष्य देण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे, तर समाजानेही पुढाकार घ्यायला हवा.योग्य प्रयत्न आणि संवेदनशील दृष्टीकोन असेल, तर अनाथ मुलींनाही आपले हक्काचे घर आणि कुटुंब मिळू शकते, हे पूजाच्या लग्नानं दाखवून दिले. हा विवाह सोहळा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रशासनाच्या या अनोख्या उपक्रमामुळे अनेक अनाथ मुलींच्या भविष्यासाठी नवी दिशा मिळू शकते. भविष्यात अशा उपक्रमांना आणखी व्यापक स्वरूप मिळावे, अशीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होत आहे.