
Ladki Bahin Scheme : राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना मागील अर्थसंकल्पात राज्य सरकारनं सुरु केली. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होत आहेत. गेल्या वर्षभरापासून या योजनेचा मोठा गाजावाजा झाला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या विजयात या योजनेचा मोठा वाटा होता असं मानलं जात आहे. त्याचबरोबर या योजनेमुळे अन्य प्रकल्पावर ताण येत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी किती खर्च झाला याची आकडेवारी सरकारनं विधानसभेत मांडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्याचा 2025-26 साठी अर्थसंकल्प सोमवारी (10 मार्च ) रोजी सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तो विधानसभेत सादर करतील. त्यापूर्वी राज्याचा आर्थिक अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. त्यामध्ये 'लाडकी बहीण' योजनेच्या खर्चाची आकडेवारी सरकारनं दिली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी डिसेंबर 2024 पर्यंत 17,505.90 कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य सरकारनं मांडलेल्या आर्थिक अहवालात देण्यात आली आहे. राज्यातील 2.38 कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे. ही योजना सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या पाच महिन्यातील ही आकडेवारी असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंच्या उत्तरानं वाढलं टेन्शन )
आर्थिक सर्वेक्षणानुसार मार्च 2024 पर्यंत, राज्यात 16,30,589 बचत गट (SHG) आहेत ज्यांची सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सार्वजनिक आणि खासगी व्यावसायिक बँकांमध्ये खाती आहेत. त्यापैकी 13,80,838 (85 टक्के) बचत गट फक्त महिलांचे आहेत.
वैवाहिक समस्या, सामाजिक समस्या, बलात्कार, मालमत्तेचे प्रश्न, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, कामाच्या ठिकाणी होणारा छळ आणि इतर समस्यांबाबतच्या तक्रारी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या समुपदेशन शाखा आणि विधी शाखेकडे करण्यात आल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहेत.
प्रति लाख महिला लोकसंख्येमागे महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या 2022 साली 75 होती. 2023 साली हे प्रमाण 77 पर्यंत वाढलंय, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world