मोसीन शेख, छत्रपती संभाजीनगर: राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडले आहे. मतदानानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष 23 तारखेला लागणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे एमएआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी भाजपच्या अतुल सावे यांच्यावर पैसे वाटप केल्याचे आरोप केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आज महत्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संभाजीनगरमध्ये मोठ्या
प्रमाणात पैशाचे वाटप झाल्याचे आरोप केलेत. भाजपचे अतुल सावे यांनी मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केल्याचे आरोप जलील यांनी केले. महत्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी पुरावे म्हणून थेट व्हिडिओही दाखवले.
काय म्हणाले इम्तियाज जलील?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपली. निवडणूक आयोग दावा करतआहे की आम्ही निःपक्षपाती निवडणूक घेतली. पण पैशांचा नंगा नाच मुंबईत केला जात होता, त्यावेळी मी मीडियाला सांगितले होते की केवळ मुंबईत नाही तर सगळीकडे जिथे भाजप आणि त्याच्या युतीत उभे असलेल्या लोकांनी पैसे वाटले. आज मी पुराव्यासह आलो आहे .
निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त काय सांगते पाहू. मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी पैसे वाटत असतील तर त्यावर कारवाई नको असं म्हटलं.. माझ्या विरोधात सावे होते त्यांनी 3 दिवस रात्री काही एजंट सोडले होते त्यांच्याकडे लिंक होती. त्यांनी आधार कार्ड जमा करून पैसे दिले. काल खुलेआम पैसे वाटत होते. ज्या ठिकाणी बूथ ताब्यात घेतले जात होते. तर त्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले. मुस्लिम दलित वस्तीत पैसे वाटले. मी याबाबतचे सर्व पुरावे निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना दिले आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले.
नक्की वाचा: लाडक्या बहिणी ठरवणार मुख्यमंत्री! महिलांचा मतांचा टक्का वाढला; फायदा कुणाला?
व्हिडिओमध्ये काय?
इम्तियाज जलील या पत्रकार परिषदेमध्ये दोन व्हिडिओ दाखवले. पहिल्या व्हिडिओमध्ये अरविंद दोनगावकर नावाचा भाजपचे सेल प्रमुख आहेत. त्यांनी जवाहरनगर मधील आपल्या कार्यालयात बसून पैसे वाटप केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अरविंद दोनगावकर हे पेशाने वकील असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी दाखवलेला दुसरा व्हिडिओ हा भारतनगरचा असल्याचे सांगण्यात आले.
भारतनगरमध्ये जालिंदर शेंडगे नावाच्या भाजपच्या नेत्याने बोगस वोटिंग केल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. जालिंदर शेंडगे यांनी बाहेरील नागरिक बोगस मतदानासाठी आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक आयोगाने कठोर पाऊले उचलावीत, असंही जलील यांनी म्हटले आहे. त्यामुळे निकालाआधी संभाजीनगरमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे.
महत्वाची बातमी: भाजपाला पाठिंबा दिला म्हणून दलित तरुणीची हत्या, मतदानाच्या दिवशी धक्कादायक घटना