राज्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले. या निवडणुकीत नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत मतदानाचा नवा विक्रम केला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे महिला मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या निवडणुकीत महिलांच्या मतदानाचे प्रमाण जवळपास तीन टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे राज्यात सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार? याचा निकाल लाडक्या बहिणींच्याच हातात असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांच्या या वाढत्या मतदानाचा कुणाला फायदा होईल?काय आहेत मतदान वाढण्याची कारणे? वाचा सविस्तर...
सत्तेची चावी महिलांच्या हाती
राज्यात सत्तेच्या चाव्या यंदा महिलांच्या हाती असल्याचे दिसत आहे. कारण राज्यात महिलांच्या मतदानात लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिलांनी एवढ्या प्रमाणावर मतदान केले आहे. यामध्ये विशेषतः ग्रामीण भागात महिला मतदानाची संख्या मोठी आहे. महिलांचे कमीत कमी 3 टक्क्यांनी तर जास्तीत जास्त 20 % मतदान वाढले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात महिलांच्या मतदानात मोठीच वाढ झाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात 15 हजार पुरुषांचं मतदान घटले आहे तर 91 हजार महिलांचे मतदान वाढले आहे. कन्नडमध्ये महिलांचं 3% मतदान तर गंगापूरमध्ये 20% वाढ झाली आहे. औरंगाबाद पश्चिममध्ये महिलांचं मतदान 15 टक्क्यांनी वाढले आहे. तर औरंगाबाद पूर्वमध्ये महिलांच्या मतदानात 5% वाढ झाली आहे.
नक्की वाचा: भाजपाला पाठिंबा दिला म्हणून दलित तरुणीची हत्या, मतदानाच्या दिवशी धक्कादायक घटना
कुठे वाढले मतदान?
परभणीमध्ये महिला मतदानाची टक्केवारी तब्बल 69.85 टक्के एवढी आहे. परभणीत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल १० टक्के जास्त महिला मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केले. नाशिकमध्ये 2019 मध्ये महिलांचं मतदान 56.06 टक्के होतं तर यंदा महिलांचे मतदान 66.96 टक्के झाले. नाशिकमध्ये २०१९ च्या तुलनेत महिलांचं मतदान तब्बल 9.33 टक्क्यांनी वाढले आहे. मुंबईत महिलांचे मतदान 53% तर पुरुषांचे मतदान 51 टक्के एवढे झाले आहे
लोकसभा निवडणुकीत महिला मतदार संख्या 4 कोटी 22 लाख 79 हजार इतकी होती. तर विधानसभा निवडणुकीत महिला मतदार संख्या 4 कोटी 66 लाख इतकी आहे. म्हणजेच गेल्या चार पाच महिन्यांत महिला मतदार 44 लाखांनी वाढल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीआधी महिलांसाठीच्या योजना हा प्रमुख मुद्दा होता. महायुती तसेच महाविकास आघाडीने महिलांसाठी केलेल्या घोषणांमुळे हे मतदान वाढले असल्याचीही शक्यता आहे.
या योजना ठरल्या प्रभावी?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जवळपास साडे सात हजार रुपये जमा झालेत. पुन्हा सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेतली रक्कम 2100 करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. महिलांना एसटीच्या तिकीटात पन्नास टक्के सवलत, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण..
दुसरीकडे, महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला उत्तर म्हणून महाविकास आघाडीनं महिन्याला ३ हजार देणाऱ्या महालक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. आता राज्यातल्या महिलांनी लाडकी बहीणवर खूष होऊन महायुतीला मतदान केलंय की तीन हजारांची अपेक्षा ठेवून मविआला मतदान केले आहे. हे लवकरच कळेल, मात्र यंदाची सत्ता स्थापन होणार ती महिलांच्याच इच्छेने.
महत्वाची बातमी: काँग्रेस किती जागा जिंकणार? आकडा आला समोर, मोठा उलटफेर होणार?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world