Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सर्वात मोठा राजकीय भूकंपा होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे तब्बल २३ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. मनपा प्रशासनाकडून एकूण २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटीसा पाठवण्यात आल्या असून सत्ताधारी अन् विरोधकांचे दिग्गज नेते अडकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर मनपात मोठा राजकीय भूकंप!!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर महापालिका मनपा प्रशासनाने सत्ताधारी भाजपच्या ७ आणि विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमच्या तब्बल १६ अशा एकूण २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेत्यांसह अनेक मातब्बर नगरसेवकांचा समावेश असल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.
निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी पुराव्यानिशी केलेल्या तक्रारींनंतर नगर सचिव, जन्म-मृत्यू आणि अतिक्रमण विभागाने प्राथमिक चौकशी केली. तर, प्राथमिक चौकशी अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने एकाच दिवशी २३ नगरसेवकांना एकूण ३७ नोटीसा धाडून स्पष्टीकरण मागवले आहे. नोटीस मिळाल्यानंतर भाजप आणि एमआयएम या दोन्ही प्रमुख पक्षांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
विशेष म्हणजे प्रशासनाने सर्व २३ नगरसेवकांना आपले म्हणणे आणि पुरावे सादर करण्यासाठी अंतिम संधी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात १७ आणि २४ तारखेला, तर सप्टेंबरमध्ये ७ आणि १५ तारखेला या प्रकरणांवर प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे. एका दिवशी १० नोटीसांवर सुनावणी घेतली जाईल. सुनावणी दरम्यान संबंधित नगरसेवकांनी ठोस कागदपत्रांसह आपली बाजू मांडली नाही, तर महापालिका प्रशासन थेट 'एकतर्फी निर्णय' घेईल, असा थेट इशारा नोटीशीद्वारे देण्यात आला आहे.