Maharashtra Rain Alert News: राज्यातून काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून संबंधित जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट जाहीर करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यभरात पावसाचा धुमाकूळ, वाचा आजचा हवामान अंदाज!
हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. या वेळी ताशी ५० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील, तर दक्षिण कोकण-गोवा भागातही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
रायगड, घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
रायगड, नाशिक घाट परिसर आणि पुणे घाट परिसरासाठी 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर यांसह विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाट परिसरात दरडी कोसळण्याची किंवा वाहतूक विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः वाहनचालकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रवासात योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक, नंदुरबारमध्ये शाळांना सुट्टी!
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मालेगाव, नांदगाव ,बागलाण इगतपुरी, कळवण,त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच शाळांसोबत उद्या भरणाऱ्या आठवडी बाजार ,जत्रा, मेळावे आणि गर्दीचे कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
तसेच नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईमध्ये पावसाची स्थिती काय?
दुसरीकडे, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहू शकतात. शहरातील कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मान्सूनच्या या नव्या सक्रिय टप्प्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि समुद्रात वादळी वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून, वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ७० किमीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे डहाणू ते श्रीवर्धनपर्यंतच्या सर्व बंदरांवर स्थानिक सावधगिरीचा इशारा देणारा 'तिसरा' धोका पत्ता फडकवण्यात आला आहे.
Nashik News: नाशिक जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट, 8 तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world