Chhatrapati Sambhajinagar News: जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी परिसरात आज पर्यटकांवर मधमाशांनी अचानक भीषण हल्ला चढवला. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे लेणी परिसरात पर्यटकांची मोठी मांदियाळी असतानाच ही घटना घडली. या हल्ल्यात तब्बल 100 पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला असून, एका महिला पर्यटकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
Delhi Fire: राजधानीत अग्नितांडव! एसीने केला घात, झोपेतच 9 जणांचा कोळसा, मृतदेहांची भयंकर अवस्था
मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, १०० जण जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यातील सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ लेणी पाहण्यासाठी राज्यभरातून आणि परराज्यातून हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. लेणी क्रमांक 16 (कैलास लेणी) आणि लेणी क्रमांक 10 या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असताना अचानक मधमाशांचे मोहळ उठले. काही कळायच्या आतच मधमाशांनी समूहाने पर्यटकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि पर्यटकांची जीव वाचवण्यासाठी प्रचंड धावपळ झाली.
या हल्ल्यात जखमी झालेल्या 100 पर्यटकांपैकी एका महिलेला मधमाशांनी मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याने तिची प्रकृती बिघडली. तिला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी या परिसरातील प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. ऐन सुट्ट्यांच्या हंगामात घडलेल्या या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.