Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील जुना बायजीपुरा, इंदिरा नगर येथील एस फाईन बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. बेकरीत सुरू असलेला भयानक निष्काळजीपणा आणि अस्वच्छतेचा डोंगर पाहून थेट अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले. सार्वजनिक आरोग्याशी उघडउघड खेळणाऱ्या या बेकरीचा अन्न सुरक्षा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित केला आहे.
अस्वच्छतेचा कळस आणि उघडे शौचालय
बेकरीच्या उत्पादन परिसरात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. धूळ, साचलेली घाण, कोळिष्टके आणि यंत्रांवर बसलेला गंज अशा अत्यंत गलिच्छ वातावरणात नागरिकांच्या रोजच्या खाण्यात जाणारा रोस्टेड ब्रेड तयार केला जात होता. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, उत्पादन क्षेत्रातच थेट दरवाजा नसलेले, उघडे अन् अत्यंत अस्वच्छ शौचालय आढळले. तिथे साधे हात धुण्यासाठी साबण किंवा वॉश बेसिनची सोयही करण्यात आलेली नव्हती.
तंबाखू चघळणारे कामगार आणि सुरक्षेचा अभाव
उत्पादन क्षेत्रात स्वच्छतेचा पुरता बोगस कारभार उघडकीस आला. कटींग केलेले वेस्टेज म्हातारीच्या केसांसारखे अस्ताव्यस्त टाकून क्रॉस कंटामिनेशनचा गंभीर धोका निर्माण करण्यात आला होता. किटकांना रोखण्यासाठी खिडक्यांना जाळ्या नव्हत्या आणि दरवाज्यांना पडदे लावले नव्हते. यात भर म्हणून उत्पादन क्षेत्रात काम करणारे कामगार थेट तंबाखू चघळताना आढळल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
( नक्की वाचा : Tukaram Mundhe: ज्या इमारतीतून मुंबई चालते, तिथेच अस्वच्छता! तुकाराम मुंढेंच्या FDA नं दिला मोठा दणका )
दुसऱ्याच कंपनीचे नाव छापून ग्राहकांची फसवणूक
या बेकरीत तयार होणाऱ्या बिग बाईट 20-20 रोस्टेड ब्रेडवर स्वतःचा पत्ता लपवून मे. गार्डन बेकर्स या दुसऱ्याच कंपनीचा पत्ता आणि FSSAI नंबर छापला जात होता. पॅकेटवर बॅच नंबर आणि एक्स्पायरी डेटचा लेबल लावलेला नव्हता. घटकांमध्ये साखरेचा वापर दाखवून न्यूट्रिशन व्हॅल्यूमध्ये मात्र ॲडेड शुगर शून्य दाखवून ग्राहकांची उघडउघड आणि घोर दिशाभूल केली जात होती.
परवाना एका नावाने आणि पॅकिंगवर दुसरेच नाव छापून चाललेला हा प्रकार म्हणजे थेट ग्राहकांच्या आयुष्याशी खेळण्याचाच प्रकार आहे. उद्या एखादी विषबाधा किंवा दुर्घटना घडल्यास लॉट रिकॉल करण्याची कोणतीही सोय इथे उपलब्ध नव्हती. बेकरीत पेस्ट कंट्रोल केले जात नव्हते आणि कोणताही तांत्रिक माणूस तैनात नव्हता. या सर्व गंभीर बाबींची दखल घेत प्रशासनाने बेकरीचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. अशा बेकायदेशीर आणि घाणेरड्या धंद्यांविरोधात ही कारवाई यापुढेही अशीच तीव्र राहील, असा कडक इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.