मोसीन शेख, छत्रपती संभाजीनगर: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केले, ज्यामध्ये त्यांनी जलजीवन योजनेसाठी कोट्यावधी रुपयांची घोषणा केली. जल जीवन मिशन योजनेचा विस्तार करणार असल्याचे सांगत त्यांनी 15 कोटी कुटुंबांना नळाद्वारे पाणी उपलब्ध झाल्याचा दावा केला. मात्र एकीकडे संसदेत घरोघरी नळाद्वारे पाणी उपलब्ध झाल्याचा दावा केला जात असतानाच मराठवाड्यात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्याच्या गेवराई पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे यांच्या अनोख्या आंदोलनाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सरपंच मंगेश साबळे यांनी महिलांच्या वेशात डोक्यावर हंडा घेऊन जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. मंगेश साबळे यांनी साडी नेसून, डोक्यावर हंडा घेऊन घोषणा देत पाणीटंचाईचे भीषण वास्तव मांडले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या दालनासमोर मंगेश साबळे यांनी हे आंदोलन केले.
माझ्या गावातील महिलांना दोन दोन किलोमीटरवरुन पाणी आणावे लागते. सुरुवातीला शुद्ध पाण्यासाठी आडात बसून आंदोलन केले त्यामुळेच महिलांनी मला मतदान केलं आणि मी सरपंच झालो. 2020-21 मध्ये याठिकाणी जलजीवन योजना सुरु झाली. मात्र चार वर्ष झाले त्याचे काम पूर्ण झाले नाही. छड्या आणल्या, पायपा आणल्या त्या सडायला लागल्या तरी अजून काम झालं नाही, असा आरोप मंगेश साबळे यांनी केला.
( नक्की वाचा : Union Budget 2025 : मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त )
तसेच चार वर्ष झाले जलजीवन मिशनचे उद्घाटन झाले, कुठे अडायला लागलं? कुठे घोड पेंड खायला लागलं. का चार चार वर्ष कामे होत नाहीत. त्यामुळे माझ्या गावाच्या महिलांच्या वतीने मी वेदना मांडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण म्हणता मगं तुमच्या लाडक्या बहीणीला न्याय द्या असे म्हणत चार वर्ष झालं हा भ्रष्टाचार सुरु आहे, लवकप आमचे जलजीवनचे काम सुरु करा.. हे निवेदन आम्ही देत आहोत, असंही ते म्हणाले.
दरम्यान, सरपंच मंगेश साबळे हे अनोख्या पद्धतीने आंदोलने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आधीही त्यांनी अशाच प्रकारे गांधीगिरी स्टाईलने आंदोलने करत नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. मराठा आरक्षणामध्ये त्यांनी गाडी पेटवून केलेला निषेध त्यानंतर लढवलेली लोकसभेची निवडणूक यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.