गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळला कोसळला आहे. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्यापस्पष्ट नाही. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणमध्ये येऊन नौदल दिनानिमित्त शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केलं होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गकडे तातडीने रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेचा रवींद्र चव्हाण आढावा घेणार आहे.
(नक्की वाचा - नगरसेवक ते खासदार; एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय, वसंत चव्हाणांनी कठीण काळात काँग्रेसला जिंकवलं!)
शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी देखील या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. "महाराज माफ करा आम्हाला. गद्दारांच्या हातून आपला झालेला अवमान आम्ही पाहू शकत नाही", असं ट्वीट विनायक राऊत यांनी केलं आहे.
( नक्की वाचा : डोंबिवली हादरलं, रस्त्यावर अल्पवयीन मुली दिसताच त्यानं केलं भयंकर कृत्य! )
महाराष्ट्र युथ काँग्रेसने देखील ट्वीट करत म्हटलं की, "भाजपाच्या भ्रष्ट कारभाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज दुपारी कोसळला. निकृष्ठ बांधकामामुळे हा पुतळा कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे."