जाहिरात

नगरसेवक ते खासदार; एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय, वसंत चव्हाणांनी कठीण काळात काँग्रेसला जिंकवलं!  

वसंत चव्हाण (Vasant Chavan Passed Away) यांच्या निधनामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

नगरसेवक ते खासदार; एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय, वसंत चव्हाणांनी कठीण काळात काँग्रेसला जिंकवलं!   
नांदेड:

वसंत चव्हाण (Vasant Chavan Passed Away) यांच्या निधनामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर नांदेड ही जागा काँग्रेससाठी महत्त्वाची होती. यावेळी काँग्रेसने वसंत चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. 

काँग्रेसनं नगरसेवक ते आमदार असा प्रवास करणाऱ्या वसंत चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. वसंत चव्हाण हे नायगाव विधानसभा मतदारसंघ (पूर्वीचा बिलोली) प्रमुख नेते. ते सुरुवातीला शरद पवारांच्या जवळ होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं 2002 साली त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून ते विजयी झाले. त्यानंतर ते काँग्रेसच्या जवळ गेले. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानं बदललेल्या परिस्थितीत त्यांनी ही निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवली आणि ती जिंकलीसुद्धा.

काँग्रेसनं नायगाव आणि परिसरात दबदबा असलेल्या वसंत चव्हाण यांना उमेदवारी देत चिखलीकरांची अडचण वाढवली होती. नांदेड मतदारसंघात मुस्लीम मतदारांचं प्रमाण मोठं आहे. गेल्यावेळी वंचित आणि एमआयएमची आघाडी होती. त्यामुळे वंचितकडं वळालेली मुस्लीम मतं पुन्हा काँग्रेसला मिळाली आणि त्याचाही चव्हाण यांना फायदा झाला. त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे एकवटलेला मराठा समाजानं काँग्रेसला साथ दिल्याचं निकालावरून स्पष्ट झालं.

नक्की वाचा - Nanded Lok Sabha 2024 : चव्हाण विरुद्ध चिखलीकर लढतीत अशोकरावांची प्रतिष्ठा पणाला

अचानक बिघडली तब्येत...
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं आज हैद्राबादच्या किन्स रुग्णालयात आजारपणातून निधन झालं. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. 
गेल्या दीड वर्षांपासून ते डायलेसिसवर होते. गेल्या आठवड्यात 15 ऑगस्ट रोजी त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. आशिवाय अचानक बीपी देखील कमी झाला होता. त्यानेळी त्यांना तत्काळ नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी एअर अँब्युलन्सने त्यांना हैद्राबाद इथं हलविण्यात आलं होतं.