सरन्यायाधीश पुत्राच्या साधेपणाने भारावले अमरावतीकर , वडिलांच्या कार्यक्रमात ज्योतिरादित्यनं वेधलं लक्ष

सरन्यायाधीश भूषण गवई हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यांचा तोच साधेपणा  त्यांचा मुलगा ज्योतीरादित्य गवई यांच्यात उतरल्याचं अमरावतीकरांना पाहायला मिळालं.

जाहिरात
Read Time: 3 mins
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुलाच्या साधेपणाने अमरावतीकर भारावले.
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी 

देशाचे 52 वे सरन्यायाधीश तथा अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई दोन दिवस बुधवार आणि गुरुवार (25 आणि 26 जून) अमरावती दौऱ्यावर होते. सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच अमरावतीत आले होते. त्यांच्या आगमनानिमित्त अमरावतीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं. सरन्यायाधीश गवई हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यांचा तोच साधेपणा  त्यांचा मुलगा ज्योतीरादित्य गवई यांच्यात उतरल्याचं अमरावतीकरांना पाहायला मिळालं. त्याची आता चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा बिहार, केरळचे माजी राज्यपाल रामकृष्ण सूर्यभान गवई उर्फ दादासाहेब यांचे चिरंजीव तथा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश भूषण गवई यांनी 14 मे 2025 रोजी भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. सरन्यायाधीश पदी निवड झाल्यामुळे दिल्ली, मुंबई येथे बार कौन्सिल तर्फे त्यांचा सत्कार घेण्यात आला. त्यानंतर गृह जिल्हा असलेल्या अमरावती जिल्हा वकील संघातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन 25 जून रोजी करण्यात आलं होतं. त्यानिमित्त ते गृह जिल्हा असलेल्या अमरावतीत पहिल्यांदाच सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर आले. 

Advertisement

अमरावतीमधील पी.आर.पोटे पाटील कॉलेजच्या सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली, मुंबई उच्च न्यायालय व कायदा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, माजी खासदार अनंत गुढे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

Advertisement

( नक्की वाचा :  भयंकर! रुग्णवाहिका कुत्र्याला धडकली, संतापलेल्या मालकानं पेशंटचा जीव घेतला! )
 

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे संचालित डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतलं. न्यायपालिका क्षेत्रातील सर्वोच्च पदावर नियुक्ती झाल्यानंतर भूषण गवई यांनी आपल्या दोन दिवसांच्या  दौऱ्यादरम्यान आपल्या महाविद्यालयात गुरुवारी (ता.26) भेट दिली. दरम्यान श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष ॲड.गजानन पुंडकर, हेमंत काळमेघ, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, डॉ. अंजली ठाकरे आदींनी महाविद्यालयातर्फे त्यांचे स्वागत केलं. 

Advertisement

काय म्हणाले सरन्यायाधीश?

दरम्यान, महाविद्यालयातील अभिप्राय पुस्तकात भूषण गवई यांनी आपला अभिप्राय देखील नोंदवला. अभिप्रायमध्ये त्यांनी म्हटलंय की,  "मला अतिशय आनंद होतोय. की जिथे मी कायद्याच शिक्षण घेतलं. त्या माझ्या महाविद्यालयात आलोय. 40 ते 42 वर्षाच्या आठवणींना उजाळा मिळाला. लॉ कॉलेजमध्ये अमुलाग्र बदल झाला. इथल्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी मी शुभेच्छा देतो" असं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

भूषण गवई यांनी एक तासापेक्षा अधिकचा काळ महाविद्यालयात घातला. विद्यार्थी, शिक्षक यासह त्यांच्या जुन्या मित्रांशी त्यांनी दिलखुलास संवाद साधला. हा कार्यक्रम त्यासाठी लक्षवेधी ठरला ज्या महाविद्यालयात भूषण गवई यांनी शिक्षण घेतलं. त्या कार्यक्रमाचे गवई हे प्रमुख होते. स्टेजवरून ते भाषण करत होते. तर स्टेजच्यासमोर त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य गवई हा प्रेक्षकांमध्ये बसून वडिलांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत होता. 

ज्योतिरादित्य काही काळ प्रेक्षकांमध्ये चांगलाच रमला. त्याला बसायलाही खुर्ची मिळाली नसल्याने तो कार्यक्रमात काहीवेळ उभाच राहिला. ही बाब लक्षात येताच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी ज्योतिरादित्य यांना हाक मारली. त्याला बसायला खुर्ची दिली. काळमेघांच्या या कृतीमुळे उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. भूषण गवई हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. तोच साधेपणा त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य गवई यांच्यामध्ये देखील अमरावतीकरांना अनुभवायला मिळाला. एकंदरीतच गवई कुटुंबातील साधेपणाचा वारसा ज्योतिरादित्य पुढे नेटाने समोर नेईल असेही मत काहीनी व्यक्त केलं. ज्योतिरादित्य सध्या इयत्ता आठवीची परीक्षा पास झाला असून नवी दिल्ली येथे नववीचे शिक्षण घेत असल्याची माहिती त्याचे काका डॉ.राजेंद्र गवई यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना दिली.
 

Topics mentioned in this article