गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूश खबर दिली आहे. गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. अशा गणेशभक्तांसाठी टोल माफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. अनेक गणेशभक्त हे मुंबई गोवा महामार्ग किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे चा गावी जाण्यासाठी अवलंब करतात. या मार्गात अनेक टोल आहेत. हे टोल माफ केल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत. त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवाय गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - मनसेचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला, तर्क वितर्कांना उधाण
राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे असे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती, ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी य़ोजना राबवावी. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराणे बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसचे दोन आमदार 'हाता' ची साथ सोडणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अर्थ काय?
राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहन तैनात करावेत.
महापालिकांनी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्नीशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सर्वंत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मुर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.