मुंबई: महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. शासकीय कंत्राटदारांच्या थकीत बिलांच्या पेमेंट्सचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पुढील 8 ते 10 दिवसांत बैठक लावून पेमेंट्स चा मार्ग सुकर करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यामध्ये लहान कंत्राटदारांच्या बिलांच्या पेमेंट्सला प्राधान्य दिले जाणार आहे.
महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटदारांची यंदा दिवाळी चांगली जाईल अशी चिन्हे आहेत. महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटदार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून कंत्राटदाराच्या थकीत बिलांच्या रकमांची देयके काढण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी कंत्राटदारांना नैराश्य झटकून टाका, आत्महत्या करू नका, महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून सर्वांची थकीत बिले मिळतील असे आश्वासन दिले आहे.
Exclusive : राज्यातील कंत्राटदारांचे 90 हजार कोटी थकवले, 'लाडकी बहीण'चाही फटका?
दरम्यान, शासनाकडून सुमारे 90 हजार कोटींची बिले थकल्याने कंत्राटदार निराशेत आहेत. याच नैराश्यातून याआधी दोन सरकारी कंत्राटदाराच्या आत्महत्या झाल्या. ज्यावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला होता. याआधी २२ जुलै रोजी सांगलीच्या हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने बिल थकल्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर १ सप्टेंबरला व्ही पी वर्मा या तरुण कंत्राटदाराने मृत्यूला कवटाळले होते.