अमजद खान, मुंबई: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या उपहासात्मक गाण्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद उभा राहिला आहे. काही दिवसांपूर्वी कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे तयार केले होते, ज्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला होता. याप्रकरणी कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला समन्स बजावले आहे. अशातच कुणाल कामराच्या हस्ते ब्रीजचे उद्घाटन होणार असल्याची पोस्ट मनसे नेत्याने पोस्ट शेअर केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी पलावा पुलाच्या कामावरुन पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. डोंबिवलीतील कोपर पुलाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने पलावा परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. याबाबत राजू पाटील यांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देत पाठपुरावा केला, मात्र अद्याप या ब्रीजचे काम पूर्ण झाले नाही, ज्यामुळे राजू पाटील यांनी संपात व्यक्त केला आहे.
त्यासोबतच या पुलाचे आता कुणाल कामराच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची पोस्टही शेअर केली आहे. तारखांच्या आश्वासनांनी 'फुल्ल', कधी होणार दोन्ही पलावा पुल ? ….की, बनत होता..बनत आहे.. बनतच राहील पलावा पूल ? उत्तर द्या.. असा सवाल करत त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच धारेवर धरले आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी या ब्रीजचे कुणाल कामराच्या हस्ते 31 एप्रिलला उद्घाटन होणार असल्याचेही म्हटले आहे.
अर्थातच ही आज 1 एप्रिल असल्याने त्यांनी 'एप्रिल फूल' केल्याचेही पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. मात्र त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान, याआधी राजू पाटील यांनी कुणाल कामराच्या एका गाण्याचा उल्लेख करत त्याचे आभारही मानले होते. डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल आभार.. असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.
(नक्की वाचा- Suresh Dhas : "बिश्नोई गँगद्वारे माझ्या हत्येचा डाव होता", सुरेश धसांचा गंभीर आरोप)