Paithani Saree : येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार अधिक चालना; 12 कोटी 23 लाखांची उद्योग विभागाकडून मंजुरी

मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र  (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Paithani Saree : पैठणी हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. चांगली पैठणी घ्यायची असेल तर महिलांची पाऊलं आपोआप येवल्याच्या दिशेने वळतात. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरात येवल्याच्या पैठणीची मोठी चर्चा असते. अगदी काही हजारांपासून ते लाख किमतीच्या पैठणी विकत घेण्यासाठी महिलांची लगबग असते. महाराष्ट्राचं हे भूषण असलेल्या येवल्याच्या पैठणी उद्योगाला अधिक चालना मिळावी यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. 

मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र  (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास (MSICDP)  योजनेंतर्गत या केंद्राची उभारणी केली जाणार आहे. यासाठी 12 कोटी 23 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सेंटरमुळे येवल्यातील पैठणी उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.

नक्की वाचा - Eknath Shinde: सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणार, मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार : एकनाथ शिंदे

मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथे पैठणी क्लस्टर साकारण्यात आला आहे. या पैठणी क्लस्टरमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यासाठी त्यांचा सातत्याने राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याच्या उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांसमवेत त्यांनी या केंद्राची पाहणी करत बैठक घेतली होती. यावेळी या केंद्राला अधिक निधी मंजूर करून सुविधा निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या.

Advertisement

त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून या योजनेला 12 मार्च 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅपेक्स समितीच्या 20 व्या बैठकीत याला मंजुरी मिळाली होती. यानुसार एकूण 1223.36 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च असून त्यामध्ये 978.68 लाख रुपये अनुदान राज्य सरकारकडून, तर उर्वरित रक्कम खासगी सहभाग आणि बँक कर्जाच्या माध्यमातून उभी केली जाणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत याठिकाणी वॉर्पिंग, रेशीम वळवण्याची सुविधा, रेशीम धागा रंगवणे, वाइंडिंग, उत्पादन डिझाइनिंग केंद्र, मूल्यवर्धन केंद्र, उत्पादन चाचणी सुविधा उपलब्ध होणार आहे. हे सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पुढील पाच वर्षात विक्रीत 1080.68 कोटी रुपयांवरून वाढ होऊन ती 1728.20 कोटी एवढी होईल. क्लस्टरच्या उत्पादकतेत 65% वरून 90% पर्यंत वाढ होईल. रोजगारात 378 वरून 949 पर्यंत वाढ होईल. नफ्यात 216.14 कोटी वरून 345.64 कोटी पर्यंत वाढ होईल तसेच निर्यातीत 0 वरून 8-10 कोटी पर्यंत वाढ होणार आहे.

Advertisement


 

Topics mentioned in this article