Yashomati Thakur: यशोमती ठाकूर यांचे खरमरीत पत्र! 'भाऊ, भाई, दादा म्हणत महायुतीला घेरलं

कृषीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीच्या केवळ ३४ टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधी कधी खर्च करणार, असा सवाल विचारत ठाकूर यांनी धक्कादायक प्रकार उघड केला.

जाहिरात
Read Time: 3 mins

Yashomati Thakur Letter To Mahayuti Government:  नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी भावनिक आणि खरमरीत शब्दांत पत्र लिहून महायुती सरकारचे कान टोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा भाऊ, भाई, दादा असा उल्लेख करत 'लाडकी बहीण' ॲड. यशोमती ठाकूर यांनी एक पत्र लिहिले आहे. यातून त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर तातडीने लक्ष देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

काय आहे यशोमती ठाकूर यांचे पत्र..

'भाऊ, भाई आणि दादा' यांना त्या लिहितात, दादांनी मांडलेल्या ७५,२८६ कोटींच्या पुरवणी मागण्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी 'खोदा पहाड, निकला चुहा' असा प्रकार आहे. २८ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळीने खरीप-रब्बी दोन्ही हंगाम मातीमोल केले. त्यासाठी सरकारने ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेले ३१,६२८ कोटींचे पॅकेज केवळ 'कागदी घोडा' ठरले. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १८,५०० रुपये मदतीचे गाजर दाखवले, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात फक्त ८,५०० रुपये टाकले. त्यातही 'केवायसी'च्या जाळ्यात अडकवून बहुतांश शेतकऱ्यांची मदत अडवून ठेवण्यात आली आहे.

'लाडकी बहीण' यशोमती ठाकूर यांनी पुरवणी मागण्यांमध्ये कृषी विभागाची केवळ बोळवण करण्यात आल्याच्या मुद्याकडेही आपल्या पत्रात लक्ष वेधले. कृषी विभागाने ६,००० कोटी रुपयांची मागणी केली असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ ६१६ कोटी रुपये दिले. यामध्येही बहुतेक निधी गोशाळा आणि नौकांच्या दुरुस्तीसाठी आहे. तसेच चार महिन्यांपूर्वी 'कृषी समृद्धी' योजनेची मोठी घोषणा केली, पण आजपर्यंत या योजनेसाठी 'एका कवडीचाही निधी' मिळाला नाही. याचा अर्थ, शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्षात काहीच पडणार नाही, हे 'लाडक्या बहिणी'ने उघड करून दाखवले आहे.

Maharashtra Politics: 19 डिसेंबरला राजकीय भूकंप, मराठी माणूस पंतप्रधान? पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत

तब्बल ४२ लाख शेतकऱ्यांच्या पदरात अनुदानाचा लाभ पडला नसल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला. गतकाळात विविध योजनांतर्गत ४२ लाख शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या अर्जांना मंजुरी मिळाली आहे. पण त्यासाठी लागणारे ३०,००० कोटी रुपये कधी मिळणार, असा थेट सवाल ॲड. ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. आर्थिक वर्ष संपायला अडीच महिने उरले असताना कृषीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीच्या केवळ ३४ टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधी कधी खर्च करणार, असा सवाल विचारत ठाकूर यांनी धक्कादायक प्रकार उघड केला.

सरकारकडे मागितला हिशोब

ठाकूर यांनी पुढे लिहिले की, एका बाजूला बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या किमती १७५ टक्क्यांनी वाढल्या, तर दुसरीकडे शेतमालाचे दर मातीमोल झाले. पांढरं सोनं (कापूस) काळवंडून गेलंय, पिवळं सोनं (सोयाबीन) मातीमोल झालंय आणि कांदा शेतात सडतोय. शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हे तुम्हीच सांगा, असा सवालही 'भाऊ, भाई आणि दादा' यांना केला. सोयाबीनचे दर ७,५०० वरून ४,०००-४,१०० रुपयांवर कसे आले, याचा हिशेबही त्यांनी मागितला.

विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा मुद्दा दिवसेंदिवस भीषण बनत आहे. सत्तेवर येताना 'महाराष्ट्रात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही' असा पण करणाऱ्या 'भाऊ, भाई आणि दादा' यांना अॅड. ठाकूर यांनी आरसा दाखवला. आज राज्यात दररोज किमान ११ शेतकरी स्वतःचं जीवन संपवत आहेत. १ जानेवारी २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या आठ महिन्यात विदर्भ मराठवाड्यात १ हजार १८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी देत शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र देशात अव्वल आहे, या वस्तुस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले.

Advertisement

नक्की वाचा >> सैनिक पतीसोबत सासरवाडीकडे निघाली..रस्त्यातच महिलेचं जीवन संपलं! स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं..

कोरोनाकाळात देशाला आधार देणाऱ्या कृषी क्षेत्राकडे निधीच्या बाबतीत केलेले हे दुर्लक्ष 'पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारे नाही', अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अखेरीस 'लाडकी बहीण' म्हणून त्यांनी 'भाऊ, भाई, दादा' यांना कळकळीची विनंती केली आहे की, शेतकऱ्यांची ही आर्थिक कोंडी तत्काळ फोडा. शेतकऱ्याला नुसत्या शब्दांनी नाही, तर प्रत्यक्ष निधीच्या आधाराने जगवा.