देवा राखुंडे, प्रतिनिधी
Baramati NCP Office Controversy: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून संपूर्ण महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. विशेषतः बारामतीमध्ये सर्वत्र शोककळा पसरलेली आहे. दादांच्या आठवणीत लोक भावुक होत असतानाच, तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयातील एका कृत्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अजित पवारांच्या निधनाला महिनाभरही पूर्ण झालेला नसताना थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयातच वाढदिवसाचा केक कापून जल्लोष करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वारंवार पाहिला जात असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पक्ष कार्यालयात वाढदिवसाचा जल्लोष
बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य पक्ष कार्यालयात हा सर्व प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारा गटाच्या महिला पदाधिकारी अनिता गायकवाड यांच्यासह इतर महिलाही उपस्थित असल्याचं दिसत आहे.
ज्या कार्यालयातून अजित पवार यांनी अनेक वर्षे राज्याचे राजकारण हाताळले आणि जिथे त्यांच्या आठवणी जिवंत आहेत, त्याच ठिकाणी अशा प्रकारे सेलिब्रेशन झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
( नक्की वाचा : Gram Panchayat : मुदत संपली तरी खुर्ची कायम! ग्रामपंचायतींबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर )
सोशल मीडियावर टीकेची झोड
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाकडून आणि कुटुंबीयांकडून सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. बारामतीमधील जनता आजही या धक्क्यातून सावरलेली नाही. अशा गंभीर परिस्थितीत पक्ष कार्यालयात वाढदिवसाचा केक कापला गेल्याने नेटकऱ्यांनी या महिला पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, किमान महिनाभर तरी संयम राखायला हवा होता अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
संबंधित महिलेने काय सांगितलं?
या प्रकरणावरून सर्वत्र टीका होऊ लागल्यानंतर आणि सोशल मीडियावर ट्रोल झाल्यांनतर अनिता गायकवाड यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.
अनिता गायकवाड यांनी सांगितले की, या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमागे कोणतेही राजकारण नाही. मला दादांच्या आशीर्वादाची गरज होती, म्हणूनच मी महिला शहराध्यक्षांकडे पक्ष कार्यालयात वाढदिवस साजरा करण्याचा हट्ट धरला होता. मात्र, माझ्या या कृतीमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी सर्वांची माफी मागते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.