योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगरपरिषदेच्या निवडणूक निकालाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा आहे. या निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वीच काही उमेदवारांना त्यांच्या पराभवाचे संदेश व्हॉट्सॲपवर प्राप्त झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निकाल हाती येण्याआधीच आपल्याला किती मतांनी पराभव स्वीकारावा लागेल, याचे अचूक आकडे सांगणारे मेसेज आल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उमेदवारांनी आता थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रारी नोंदवल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
वंचित बहुजन आघाडी, शेतकरी पॅनल आणि तेल्हारा नगर विकास मंच यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या सिद्धार्थ शामस्कार यांनी या संदर्भात तेल्हारा पोलिसांकडे तक्रार केली आहे.
विद्या शामस्कार यांच्या दाव्यानुसार, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10.23 वाजता त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून संदेश आला. सुरुवातीला फक्त 'Hi' असा मेसेज पाठवून त्यानंतर 'आप चुनाव हार रहे हो' आणि '1369 व्होटो से' असे संदेश पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून हे मेसेज आले, त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो आणि भाजपचे कमळ चिन्ह होते. इतकेच नाही तर त्या प्रोफाइलवर 'PS to Home Minister' असेही लिहिलेले होते, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
( नक्की वाचा : Navneet Rana : 'तर आपण एका मुलावर का समाधानी राहायचे?'; नवनीत राणांनी मांडला लोकसंख्येचा नवा फॉर्म्युला )
प्रत्यक्ष निकाल आणि संदेशातील आकड्यांचा मेळ
विद्या शामस्कार यांनी आपल्या तक्रारीत एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रत्यक्ष निकाल जाहीर झाला तेव्हा त्यांचा पराभव साधारण 2970 मतांनी झाला होता, मात्र त्यांना आलेल्या संदेशात 1369 मतांचा उल्लेख होता.
हे आकडे पूर्णपणे जुळत नसले तरी, निकाल लागण्यापूर्वीच अशा प्रकारचे संदेश येणे हे निवडणूक प्रक्रियेत काहीतरी अघटीत घडल्याचे निदर्शक असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या युतीचे 5 उमेदवार विजयी झाले असून 7 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. मतसंख्येतील हा विरोधाभास आणि आगाऊ मिळालेले संदेश यामुळे निवडणूक यंत्रणेवर दबाव तर नव्हता ना, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
(नक्की वाचा : Akola News : अकोल्यातील बहुचर्चित दंगल प्रकरणात 14 वर्षांनी 59 जणांना मिळाला न्याय; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय )
इतर उमेदवारांनाही आले संदेश
केवळ विद्या शामस्कार यांनाच नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी थाटे यांनाही अशाच प्रकारचा अनुभव आला आहे. शिवानी थाटे यांनीही तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांना 21 डिसेंबर रोजी सकाळी 10.35 वाजता एक मेसेज प्राप्त झाला होता.
त्यामध्ये 'तुम्ही 941 मतांनी पराभूत होणार' असे स्पष्टपणे नमूद केले होते. प्रत्यक्षात या निवडणुकीत भाजपच्या वैशाली पालीवाल या 1242 मतांनी विजयी झाल्या. शिवानी थाटे यांना आलेला संदेश ज्या नंबरवरून आला होता, तो नंबर महाराष्ट्राबाहेरील असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
ईव्हीएम आणि पारदर्शकतेवर संशय
निकालाच्या आधीच पराभवाचे भाकीत वर्तवणारे मेसेज आल्यामुळे राजकीय पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उबाठा गटाने या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असावी, असा संशय व्यक्त केला आहे.
राजकीय हेतूने प्रेरित होऊन मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी हा कट रचला गेल्याचा आरोप केला जात आहे. या मेसेजमुळे उमेदवारांच्या मनात निकालाच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाली आहे.
तेल्हारा पोलिसांनी दोन्ही उमेदवारांच्या तक्रारींची दखल घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरून हे संदेश पाठवण्यात आले, ते क्रमांक कोणाचे आहेत आणि त्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
सायबर सेलच्या मदतीने या संदेशांचे मूळ शोधण्याचे काम सुरू झाले आहे. या तपासातून नेमके काय सत्य बाहेर येते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.