जाहिरात

Akola News : अकोल्यातील बहुचर्चित दंगल प्रकरणात 14 वर्षांनी 59 जणांना मिळाला न्याय; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Akola News :  अकोला शहरात 14 वर्षांपूर्वी झालेल्या जातीय हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने आता एक अतिशय महत्त्वाचा निकाल दिला आहे.

Akola News : अकोल्यातील  बहुचर्चित दंगल प्रकरणात 14 वर्षांनी 59 जणांना मिळाला न्याय; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
Akola News :  तब्बल 14 वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईनंतर हा निर्णय आला आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला 

Akola News :  अकोला शहरात 14 वर्षांपूर्वी झालेल्या जातीय हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने आता एक अतिशय महत्त्वाचा निकाल दिला आहे. 2011 मध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण अकोल्यात मोठी खळबळ माजली होती, मात्र आता पुराव्यांच्या अभावामुळे या प्रकरणातील सर्व 59 आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

तब्बल 14 वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईनंतर आरोपींना मोठा दिलासा मिळाला असून अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे.

काय होते प्रकरण?

या प्रकरणाची पाळेमुळे नोव्हेंबर 2011 मधील एका फेसबुक पोस्टमध्ये दडली आहेत. कारंजा येथील एका तरुणाने फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट टाकली होती, ज्याचे तीव्र पडसाद अकोल्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ 28 नोव्हेंबर 2011 रोजी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी अकोला शहर बंदचे आवाहन केले होते. 

या बंद दरम्यान शहरातील तिलक रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता. जमावाने घोषणाबाजी करणे, दुकाने सक्तीने बंद पाडणे, लूटपाट, मारहाण आणि वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता.

(नक्की वाचा : Yavatmal News : दीड हजार लोकवस्तीच्या गावात 27 हजार जन्म; यवतमाळमधील 'त्या' ग्रामपंचायतीत नक्की घडतंय काय? )

पोलिसांची कारवाई आणि गंभीर कलमे

तत्कालीन सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. मुस्लीम नुमाइंदा कौन्सिलने पुकारलेल्या या बंदमध्ये काही समाजकंटकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केला, असा दावा पोलिसांनी केला होता. यानंतर पोलिसांनी एकूण 59 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दरोडा, दंगल घडवणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि गुन्हेगारी कट रचणे अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. यामध्ये भा.दं.वि. कलम 397, 395, 394 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलमांचा समावेश होता.

न्यायालयात काय घडले ?

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. श्रीसागर यांच्या न्यायालयात पार पडली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तक्रारदार विलास पाटील यांच्यासह पाच महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली. मात्र, उलटतपासणी दरम्यान साक्षीदारांच्या जबानीत अनेक विसंगती असल्याचे समोर आले. अभियोजन पक्ष आरोपींविरुद्ध न्यायालयात ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर करू शकला नाही. या प्रकरणातील आरोपींपैकी अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची होती, त्यांना 'वहादत-ए-इस्लामी हिंद' या संस्थेने कायदेशीर मदत पुरवली.

( नक्की वाचा : Amravati News :अमरावतीत बापा देखत पोटचा गोळा वाहून गेला; कॅनलमध्ये पाय धुताना भयंकर घटना )
 

14 वर्षांनी मिळाला न्याय

दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात ज्येष्ठ फौजदारी वकील ॲड. नजीब शेख यांनी 45 आरोपींच्या वतीने प्रभावी युक्तिवाद केला. साक्षीदारांच्या साक्षीमध्ये असलेले अंतर आणि पुराव्यांची कमतरता याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. अखेर न्यायालयाने सर्व बाबी तपासून सर्व 59 आरोपींना निर्दोष मुक्त केले. 14 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा निकाल लागल्याने आरोपींच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. या निकालामुळे पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास अधोरेखित झाला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com