Tuljabhavani Temple : तुळजापुरातील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीकडून छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे 108 फुटी भव्य शिल्प वादात अडकले आहे. समिती आणि प्रशासनातील विसंगतीबाबतचे वृत्त यापूर्वी समोर आले आहे. याशिवाय देवीचं रुप अष्टभुजा की द्विभुजा असावे याबाबतही संभ्रम होता.
दरम्यान, तुळजापुरात साकारण्यात येणारं आई तुळजाभवानीचं 108 फुटी शिल्प अष्टभुजा रूपातच दाखवण्यात येणार असल्याचं शक्यता निर्माण झाली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानाने शिल्पाच्या मॉडेल संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निविदेतून यासंदर्भात स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
नक्की वाचा - Tuljabhavani Devi : तुळजाभवानी देवीच्या 108 फुटी शिल्पाबाबत नव्या वादाला तोंड; समिती अन् प्रशासनात विसंगती
शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांकडून अडीच ते तीन फुटांचे फायबर मॉडेल मागविण्यात आले आहे. मंदिर संस्थानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात इतिहास तज्ज्ञ गणेश खरे यांच्या लिखाणाचा संदर्भ देण्यात आला आहे, यानुसार तुळजाभवानी अष्टभुजा असलेलीच आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या संदर्भाचा आधार घेऊनच शिल्पाचे मॉडेल तयार करण्याच्या शिल्पकारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
आई तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच्या प्रसंगाच्या शिल्पात देवीच रूप अष्टभुजा की द्विभुजा यावरून वाद झाला होता. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मुंबईत बैठक घेऊन अष्टभुजा स्वरूपातील देवीचे संकल्पचित्र देवीच्या वेबसाइटवरून हटविण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानंतर मंदिर संस्थानने हटवलेल्या संकल्पचित्रातील अष्टभुजा असलेल्या देवीच्या स्वरूपावरच अखेर शिक्कामोर्तब असल्याचं संकेत आहेत.