डहाणूतील खलाशाचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू, दीड महिन्यांपासून कुटुंबीय मृतदेहाच्या प्रतीक्षेत

18 मार्च 2024 रोजी विनोद यांचा पाकिस्तानातल्या कराची येथील तुरुंगात मृत्यू झाला. दीड महिन्यानंतरही विनोद यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना मिळालेला नाही. 

जाहिरात
Read Time: 3 mins

मनोज सातवी, पालघर

पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील एका खलाशाचा तुरुंगात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विनोद लक्ष्मण कोल (55) असं या मृत खलाशाचे नाव आहे. विनोद कोल हे डहाणूच्या अस्वाली गावच्या खूनवडे-गोरातपाडा येथील रहिवासी होते. 18 मार्च 2024 रोजी विनोद यांचा पाकिस्तानातल्या कराची येथील तुरुंगात मृत्यू झाला. दीड महिन्यानंतरही विनोद यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना मिळालेला नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

मासेमारी करताना पाकिस्तानची समुद्री सीमा ओलांडल्याच्या आरोपाखाली 2022 सालापासून तो कराची येथील तुरुंगात शिक्षा भोगत होता. विशेष म्हणजे विनोद यांच्या शिक्षेचा कालावधी संपल्यानंतरही त्यांच्यावर तुरुंगात खितपत पडण्याची वेळ आली होती. विनोदच्या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विनोद आणि त्याचे सहकारी 25 सप्टेंबर 2022 साली गुजरातच्या ओखा बंदरातील मत्स्यगंधा 9 ही मासेमारी बोट घेऊन अरबी समुद्रात गेले होते. त्यावेळी पाकिस्तानच्या तटरक्षक दलाने त्यांना 27 सप्टेंबर 2022 रोजी पकडले होते. या बोटीत एकूण 9 खलाशी होते, त्यापैकी 7 खलाशी डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजातील होते. 

(नक्की वाचा - टेम्पो गाड्यांना उडवत गेला, वाडा भिवंडी महामार्गावर मृत्यूचं तांडव; तिघांचा मृत्यू)

खलाशांची नावे 

नवश्या महाद्या भिमरा, सरीत सोन्या उंबरसाडा, कृष्णा रामज बुजड, विजय मोहन नगवासी, विनोद लक्ष्मण कोल, जयराम जान्या सालकर, उधऱ्या रमण पाडवी यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी विनोद यांचा कराची येथील तुरुंगात मृत्यू झाला आहे. विनोद यांना 8 मार्च रोजी स्नानगृहात असताना अर्धांगवायचा झटका आला होता. त्यानंतर उपचार सुरू असताना 18 मार्च रोजी मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. 

Advertisement

विनोद यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर कुटुंबिय मानसिक तणावात होते. विनोदच्या पश्चात त्यांची पत्नी सखू तसेच भारती(विवाहित), मालती, वृतिका, कल्पित या मुली आणि चिराग आणि पिंटू हे मुले आहेत.आम्हाला कोणतीही आर्थिक मदत नको, तर मृतदेह हवा आहे, अशी विनंती मृत विनोद यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. 

याबाबत शांतीवादी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांनी विनोदचा मृतदेह 30 एप्रिल किंवा 1 मे रोजी भारतात येणार असल्याची माहिती दिली. सध्या भारतातील एकूण 183 कैदी पाकिस्तानच्या वेगवेगळ्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी 35 कैदी येत्या 30 एप्रिल रोजी सुटका करण्यात येणार आहे, अशी माहिती जतिन देसाई यांनी दिली. 

Advertisement

मच्छीमार खलाशी गरीब असून पोटाची खळगी भरण्यासाठी समुद्रात जात असतात. त्यांना भारत आणि पाकिस्तानची समुद्र सीमा कुठपर्यंत आहे हे कळत नाही. ते ज्या ठिकाणी मासे असतील तेथे मासेमारीसाठी जातात. त्यामुळे अशा मच्छिमारांना पकडणे चुकीचे आहे. तरी दोन्ही देशांनी सीमोल्लंघन केलेल्या मच्छिमारांना जर पकडले तर त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परतून लावलं पाहिजे, असं जतिन देसाई यांनी सांगितलं. 

(नक्की वाचा- गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, महाराष्ट्रासाठी मात्र नकार)

प्रशासनाला याबाबत माहितीच नाही

विनोद कोल या खलाशाच्या पाकिस्तान कारागृहात मृत्यू झाल्याबाबतची माहिती अद्याप जिल्हा प्रशासनाकडे नाही. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी डहाणूचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, अशी माहिती कोल कुटुंबियांकडून कळली असल्याचं सांगितलं. याबाबत चौकशी सुरू असून, आम्ही जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागवत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.  

Advertisement
Topics mentioned in this article