सुरज कसबे, पुणे: दोन आठवड्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुन्हा एकदा हिंजवडीत पाहणी दौरा करत आहेत. दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा पालन करत त्यांनी विकास कामांना सुरुवात केली की नाही याची उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्यांवरुन अजित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
समोर आलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री अजित पवार हे भल्या पहाटेच पुण्यामध्ये दाखल झाले. यावेळी हिंजवडीमधील समस्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी एका मंदिराचा मुद्दा मांडत असताना हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना खडेबोल सुनावले. "आपलं वाटोळं झालं हिंजवडीचं सगळं आयटी पार्क माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर चालले. तुम्हाला काही पडलेलं नाही. कशाला मी सहा वाजता येतो? माझी माणसं नाहीत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांचीही चांगलीच शाळा घेतली. "353 दाखल केल्याशिवाय पर्याय नाही. कोणीही असलं मध्ये येईल त्याच्यावर 353 दाखल करा. अजित पवार जरी असला तरी 353 दाखल करावाच लागेल त्याशिवाय काय होणार नाही, अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या. कोणालाही मध्ये येऊ देऊ नका, कोणतीही आडवा आडवी करू नका, कोणी आडवा आल तर समजून सांगणार, एकदाच कामच करून टाकायचं," असंही ते म्हणाले
दरम्यान, अजित पवार यांनी त्यांनी सुचवलेल्या कामांपैकी मागील दोन आठवड्यात हिंजवडीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे सुमारे 166 बांधकामे जमीनदोस्त करत प्रशासन देखील कामाला लागल्याचे बघायला मिळते. मात्र हिंजवडीतील रस्त्यांची दुरावस्था मेट्रोचा संथ गतीने चालणार काम त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी त्याचबरोबर नाल्यावरील बांधकाम व्यवसायिकांच्या अनधिकृत टोलेजंग इमारती पाडल्या जातील का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर? पक्षांतराचे दिले संकेत