रेवती हिंगवे, पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीप्रमाणेच मिश्किल टिप्पणी आणि रोखठोक वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. कोणत्याही विषयावर परखड भाषेत व्यक्त करण्याची अजित पवार यांची खास स्टाईल आहे. अजित पवार यांच्या या बेधडक स्वभावाचा प्रत्यय पुण्यातील एका कार्यक्रमात आला. पुण्यामध्ये एका रुग्णालयाचे उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणामध्ये अजित पवार यांनी डॉक्टरांनी त्यांच्या आई वडिलांच्या केलेल्या सत्कार समारंभावरुन जोरदार फटकेबाजी केली.
काय म्हणाले अजित पवार?
"कार्यक्रमाच्या आधी डॉक्टरांनी मला त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्याची विनंती केली. मला वाटलं डॉक्टर सत्कार करताना छानशी शॉल वगेरे आणतील. पण त्यांनी आणलेल्या शॉलपेक्षा अंग पुसायचा टॉवेलही मोठा असतो. डॉक्टरांनी रुग्णालयाला एवढा खर्च केला आणि वडिलांना शाल देताना मात्र काटकसर केली डॉक्टर हे वागणं बरे नव्हं," अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली.
तसेच "आई वडिलांनी जन्म दिला. म्हणून तुम्ही हे बघू शकला, म्हणून तुम्हाला डिंपल मिळाली. तुमचं भलं झालं अशी कोपरखळीही अजित पवारांनी लगावली. सगळे म्हणतात या बाबाला कार्यक्रमाला बोलवायचं म्हणजे हा बाबा काहीही बोलून जाईल पण मी खरं बोलतो," असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. दादांच्या या फटकेबाजीने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी कार्यक्रम पत्रिकेवरुनही आयोजकांवर निशाणा साधला. डोळ्याच्या दवाखान्याचे उद्घाटन होत आहे आणि ही पत्रिका गमतीशीर काढली आहे. पत्रिकेत अक्षर अतिशय बारीक लिहिले आहेत ज्यांना हे अक्षर वाचता आला नाही त्यांना या डॉक्टरची गरज नाही, त्यांना रुग्णालयात जायची गरज नाही, असं सांगायचं आहे का? असा टोमणा त्यांनी मारला.