निनाद करमारकर, अंबरनाथ: अंबरनाथमध्ये पावसात लघुशंका करण्यासाठी गेलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात महावितरण अधिकारी, कर्मचारी आणि एका कंपनीच्या मालकाविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबरनाथ पश्चिमेला राहणारा विघ्नेश कचरे हा 17 वर्षीय युवक 20 मे रोजी सायंकाळी पाऊस सुरू असताना केटी स्टील परिसरातील प्रियांश फूड कंपनीच्या संरक्षक भिंती जवळ लघुशंका करण्यासाठी गेला होता. मात्र या कंपनीच्या मालकाने भूमिगत विद्युत वाहिन्या उघड्या ठेवल्या होत्या.
त्यामुळे कंपनीच्या कंपाउंडमधील सिमेंटच्या खांबांना लावलेल्या लोखंडी तारांमध्ये विजेचा प्रवाह आला होता. या ठिकाणी लघुशंका करण्यासाठी गेलेल्या विघ्नेश कचरे याला यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी प्रियांश फूड कंपनीचा मालक आणि भूमिगत विद्युत वाहिन्या उघड्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणारे महावितरणचे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.
Badlapur News: बदलापूरकरांना मोठा दिलासा! पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार