
निनाद करमरकर, बदलापूर
Badlapur News : वाढत्या लोकसंख्येमुळे बदलापूर शहरात होत असलेली पाणीबाणी अखेर संपणार आहे. कारण राज्य सरकारने नगरोत्थान योजनेतून बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. यासाठी आमदार किसन कथोरे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे प्रयत्नशील होते. त्यानुसार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत 260 कोटींच्या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूर शहराची लोकसंख्या जवळपास साडेचार लाख असून वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. बदलापूरला वाढीव पाणीपुरवठा योजना मिळावी, यासाठी बदलापुरातील आमदार किसन कथोरे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या बदलापूर दौऱ्यात बदलापूरची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर राज्य सरकारने 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून बदलापूरकरांना मोठा दिलासा दिलाय. या योजनेअंतर्गत बदलापुरात 74 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार असून 14 जलकुंभ उभारले जाणार आहेत. या पाणीपुरवठा योजनेमुळे बदलापूरकरांचा 2056 पर्यंतचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world