अविनाश पाटील, प्रतिनिधी
जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी कोण आहे? याचे उत्तर बहुतेक पुराणकथांच्या अभिरुची संपन्न ग्रंथांमध्ये सापडेल. मानवी आशावादाची अशी अनेक उदाहरणे देता येतील. पुराणकथांच्या गर्भात शिरणाऱ्या प्रश्नांचं प्रयोजन एवढेच की, ब्रम्हांडाच्या गर्भात ठायी-ठायी आणि शाश्वत असं काही असेल तर तो म्हणजे निसर्ग. परिसंस्था निकोप असतील जर पर्यावरण शाबूत असेल तरच मानवी आरोग्य, मानवी स्वास्थ्य चांगलं राहील. पर्यावरण तज्ज्ञांचा अभ्यास, वैज्ञानिकांचे संशोधन आणि हजारो वर्षांचा मानव सभ्यतेचा इतिहास उघडून पाहिला तर सुज्ञास अधिक सांगणे न लागे!
NDTV मराठीचे प्रतिनिधी अविनाश पाटील यांनी इंद्रायतीच्या प्रदूषणामागील नेमकं कारण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी एका माहितीपटाची निर्मिती केली. तोयम असं या माहितीपटाचं नाव. विशेष म्हणजे नदी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या जीवित नदी आणि जल बिरादरी या सामाजिक संस्थांकडून तोयमची दखल घेण्यात आली असून अभिजात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लातूर येथे तोयमने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार पटकावला. हा माहितीपट मुंबा फिल्म फेस्टिव्हल आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही पाठवण्यात आला आहे. माहितीपटाचे चित्रीकरण आनंदकुमार पाटील आणि शरण केंगार तर एडिटिंग प्रतीक माधुरी यांनी केले आहे.
नक्की वाचा - Orange Exports : बांगलादेश निर्यातीचा पर्याय बंद, रस्त्यावर संत्री विकणाऱ्या महिलेने मांडली व्यथा
दिग्दर्शन अविनाथ पाटील यांनी इंद्रायणीच्या बदलत चाललेल्या विदारक परिस्थितीचा घेतलेला धांडोळा...
महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरात पर्यावरणीय समस्येनं गंभीर स्वरूप धारण केले आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि अलीकडेच आयटी हब म्हणून लौकिक मिळवलेल्या पुणे शहरात नदी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. मुळा, मुठा आणि इंद्रायणी सारख्या नद्यांची परिस्थिती अतिशय विदारक झाली असून याबाबत सरकारी अनास्था आहे. देहू आणि आळंदी या पवित्र धार्मिक स्थळांवर होणारं प्रदूषण हे सभ्य महाराष्ट्राला शोभणारं नाही. उगमापासून ते संगमापर्यंत 105 किलोमीटर प्रवास करणाऱ्या आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या इंद्रायणीतील प्राणवायू कमी झाला आहे. परिणामी जलचर जीवन धोक्यात आहे. दरवर्षी हजारो-लाखो वारकरी देहू आणि आळंदी येथे येत असतात.
सालाबादप्रमाणे इंद्रायणी पुन्हा फेसाळली आहे. यावेळी तिचं स्वरूप भयंकर असून फेसळणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आहे. अवघ्या महाराष्ट्राच श्रद्धास्थान असलेल्या माऊलींच्या आळंदीत इंद्रायणीमध्ये वारकरी पवित्र स्नान करतात. इंद्रायणी नदी पुन्हा पुन्हा फेसाळते. आज देखील पांढरे शुभ्र बर्फासारखे तुकडे नदीवर तरंगताना दिसतात. कोणत्याही नदीचं प्रदूषण तिच्या आजूबाजूला असणाऱ्या शंभर किलोमीटरच्या खोऱ्याला प्रभावित करत असतं. म्हणून इंद्रायणी बाबतची वस्तुस्थिती पाहता प्रदूषण, प्रदूषणाची करणे, उपाय, सरकारी अंमलबजावणी, कृती आरखडा याबाबत सविस्तर आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.
नक्की वाचा - ओम खड्डे देवाय नम:, खड्डा मोठा पडू दे नम: ; पंढरपुरात तरुणाने खड्ड्यांसमोर मांडली पूजा, Video व्हायरल
ऑक्सिजनची पातळी शून्य - वैज्ञानिकांचा दावा
पुणे विद्यापीठातील पर्यावरण विभागाचे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ संजय काळे यांच्या मते, इंद्रायणी नदीची ऑक्सिजन पातळी शून्यावर पोहोचली आहे. त्यांनी केलेल्या परीक्षणानुसार इंद्रायणीच्या पाण्यात नायट्रेट आणि फॉस्फेटचे प्रमाण वाढले असून नदीवर फेसळणारं पाणी आपल्याला पाहायला मिळतं. नदीवर अशा प्रकारचा तवंग निर्माण होणे म्हणजे प्रदूषणाला आमंत्रण देण्यासारखं आहे. पाण्यात पसरणाऱ्या नायट्रेट आणि फॉस्फेटमुळे जलपर्णीला जोर मिळतो आणि परिणामी नदीवर पसरलेल्या विस्तीर्ण जलपर्णीमुळे सूर्याची प्रकाश किरणं आणि पाण्याचा संपर्क यांस बाधा येते. प्रकाश किरणे थेट पाण्याच्या संपर्कात येत नसल्यामुळे नदीची प्राणवायू क्षमता (Oxygen Level) कमी होते. सातत्याने वाढणाऱ्या प्रदूषणामुळे इंद्रायणीची अवस्था मृत नदीसारखी झाली आहे. इंद्रायणी नदी, खोरे आणि भूजल पाण्याचे नमुने गोळा करून डॉ. काळे यांनी यावर विस्तृत संशोधन केले आहे. यावर उपाय म्हणून घरातला मैला आणि ड्रेनेजमधून जाणारं सांडपाणी यांची सुवेज ट्रीटमेंट प्लांट अंतर्गत शुद्धता तपासली जावी असे सुद्धा डॉ. काळे नमूद करतात. महाराष्ट्रात पंचगंगा आणि इंद्रायणी या दोन्ही नद्यांची अवस्था पाहता वेळीच उपाय केला गेला नाही, तर भविष्यात प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सर रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे देखील काळे म्हणाले.
नदी काठ आणि पाणथळ संरक्षण
शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या नदी सुधार योजना या वेळखाऊ आणि फोल आहेत, असे परखड मत पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सारंग यादवडकर यांनी व्यक्त केले. सरकारची नदी तट सुधार प्रकल्प योजना म्हणजे मोजक्या कंत्राटदारांकडून व्यावसायिक कारणांसाठी केलेलं प्रयोजन आहे. नदी सुधार प्रकल्प हा प्रत्यक्षात नदी विध्वंस प्रकल्प आहे. कारण या प्रकल्पात नदीच्या दोन्ही बाजुला साधारण 35 ते 40 टक्के रुंदी कमी केली जाते. यामुळे नदीची जी पाणथळ जागा आहे ती धोक्यात येते. पूर आल्यावर नदीच्या पाण्याला पसरायला जास्त क्षेत्र लागतं. त्यामुळे नदीवर भिंती उभारून आपण त्याच्या प्रवाहाला बाधा आणण्याचं काम करत आहोत. नदीच्या बाजूला भिंती उभारून एकप्रकारे नदीचे एका कॅनॉलमध्ये रूपांतर करण्याचं काम अशा प्रकल्पांच्या माध्यमातून केले जाते. यात नदी सुधार वगैरे असे काही नाही.
आज परिस्थिती अशी आहे की, शहराकाठी वसलेल्या सर्व नद्या मृत आहेत. नदी ही परिसंस्थाच अशी आहे की, नदी आणि काठ यांचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध असतो. त्यामुळे तटबंदी ही कोणत्याही शहराला अतिशय घातक आहे. जोपर्यंत आपण नदीचं डायनॅमिक समजून घेत नाही, तिच्या प्रवाहाचा कॅरेक्टर समजून घेत नाही तोपर्यंत नदीवर कोणत्याही प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं अतिशय घातक आहे. नद्यांबाबत योग्य ती अंमलबजावणी आपल्याकडे होत नसल्यामुळे ही उदासीनता पाहायला मिळते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2019 मध्ये इंद्रायणी नदी प्रदूषणावर कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अजूनही तो राबवला गेलेला नाही. इंद्रायणी नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या-मोठ्या कारखान्यांमधून येणारे सांडपाणी शुद्धीकरण न करता जसच्या तसं इंद्रायणीमध्ये सोडलं जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदीचं प्रदूषण वाढत आहे.
नक्की वाचा - विठ्ठलाच्या चरणी सुवर्णहार, किंमत ऐकून हैराण व्हाल
वाढती लोकंख्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर
आज आपल्या शहरांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध नाही. येवढ्या मोठ्या लोकसंख्येला ज्या प्रमाणत सॉलिड वेस्ट डिस्पोजल आणि सूवेज ट्रीटमेंटची क्षमता असायला हवी ती आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अशुद्ध मैला आणि औद्योगिक अपशिष्ट थेट नदीमध्ये सोडला जातो. नागरवस्ती आणि कारखान्यातून येणारे एफ्लून्ट सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (STP) च्या अंतर्गत शुद्ध झाले पाहिजे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात असलेल्या सूवेज ट्रीटमेंट प्लांट्सची क्षमता पाहता यात आणखी काही प्लांट्स वाढवण्याची गरज आहे. प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असून नको त्या प्रकल्पांच्या माध्यमांतून भरमसाठ पैसा नदी संवर्धनासाठी ओतला जात आहे. यामुळे नदी संवर्धनासाठी अहोरात्र झटणाऱ्यांची दिशाभूल करून प्रशासन काय साध्य करू पाहतंय हा एक प्रश्नच!. अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी माईची पवित्रता कशी अबाधित राखता येईल यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.