राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. काल 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र दोन ते तीन मिनिटांचा उशीर झाल्याने दोन उमेदवारांना अर्ज भरता आला नाही.
वंचित बहुजन आघाडीत सामील झालेले माजी काँग्रेस मंत्री अनिस अहमद यांना दोन मिनिटं उशीर झाल्यामुळे त्यांना अर्ज दाखल करता आलं नाही. त्यांना मध्य नागपुरातून उमेदवारी अर्ज भरायचा होता. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काढलेल्या रॅलीत उशीर झाल्यामुळे ते दोन मिनिट उशीराने पोहोचले. त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.
नक्की वाचा - विधानसभा निवडणुकीत बड्या नेत्यांचा प्रचाराचा धुरळा, काँग्रेस अन् भाजपकडून कोण उतरणार मैदानात?
मिळालेल्या माहितीनुसार, अनिस अहमद यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात अपील केलं आणि त्यांचा अर्ज स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांची विनंती स्वीकारण्यात आली नाही. अनिस अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या प्रतिनिधीला आत बसवलं होतं. त्यांना आठ नंबरचं कुपनही देण्यात आलं होतं. ते 3 वाजेपूर्वी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या आत पोहोचले होते, असा दावा अनिस अहमद यांनी केला आहे.
याशिवाय कर्जत विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार जे.पी. पाटील यांना मंगळवारी अर्ज न भरताच माघारी यावे लागले. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत कार्यालयात न पोहोचल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. या प्रकरणात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय जाधव यांनी दुपारी तीन वाजता ध्वनिक्षेपकावरुन अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्याचे जाहीर केले.