ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी
Cockroach in Biryani: हॉटेलमध्ये जाऊन आवडीच्या पदार्थावर ताव मारणे ही अनेकांसाठी आनंदाची गोष्ट असते. मात्र, याच हॉटेलच्या अन्नात जर आरोग्याला घातक असणारी गोष्ट आढळली, तर ग्राहकांच्या सुरक्षेचे काय, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. धाराशिव शहरातील अत्यंत नामांकित आणि प्रसिद्ध असलेल्या मातोश्री बिर्याणी हॉटेलमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हॉटेलमध्ये बिर्याणी खात असताना थेट मेलेले झुरळ आढळून आल्याचा खळबळजनक आरोप ग्राहकांनी केला आहे. या प्रकारामुळे धाराशिव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हॉटेलमधील अन्न सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर रित्या ऐरणीवर आला आहे. ग्राहकांनी या घाणेरड्या प्रकाराबाबत आवाज उठवला, तेव्हा त्यांना मिळालेल्या वागणुकीमुळे हा वाद आता आणखीनच पेटला आहे.
काय आहे प्रकरण?
धाराशिवमधील मातोश्री हॉटेलमधील बिर्याणी चांगलीच प्रसिद्ध आहे. अविनाश राऊत आणि बाळासाहेब कवडे हे दोघे मित्र तब्बल 40 किलोमीटर अंतरावरून केवळ या हॉटेलची प्रसिद्ध बिर्याणी खाण्यासाठी शहरात आले होते. हॉटेलमध्ये बसून बिर्याणी खात असताना अचानक त्यांच्या प्लेटमध्ये एक मेलेले झुरळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हा अत्यंत किळसवाणा प्रकार पाहून दोन्ही ग्राहकांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी तातडीने या प्रकरणाबाबत हॉटेलच्या व्यवस्थापनाला जाब विचारला आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावरून तीव्र आक्षेप नोंदवला.
( नक्की वाचा : Malvani Khaja: पाणीपुरी, कापड बाजारानंतर आता मालवणी खाजावरही परप्रांतीयांचा डल्ला; थेट कारखानाच थाटला! )
हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांची दमदाटी
ग्राहकांनी केलेल्या आरोपांनुसार, बिर्याणीत झुरळ निघाल्याची तक्रार केल्यानंतर हॉटेल प्रशासनाने आपली चूक मान्य करण्याऐवजी अत्यंत उद्दामपणाची भूमिका घेतली. हॉटेल मालक आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी मिळून तक्रार करणाऱ्या दोन्ही ग्राहकांना थेट दमदाटी करण्यास सुरुवात केली.
एवढेच नव्हे, तर हॉटेलमध्ये इतर लोकांसमोर त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोपही ग्राहक अविनाश राऊत आणि बाळासाहेब कवडे यांनी केला आहे. हॉटेल प्रशासनाच्या या अरेरावीमुळे संतापलेल्या ग्राहकांनी आता या प्रकरणाची रीतसर तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे करण्याचा इशारा दिला आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट, सोमवारपासून लागू होणार नवे वेळापत्रक, 'या' गोष्टींवर निर्बंध! )
अन्न सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह
मातोश्री बिर्याणी हा धाराशिव जिल्ह्यातील एक मोठा आणि प्रसिद्ध ब्रँड मानला जातो. धाराशिव शहरासह आजूबाजूच्या अनेक शहरांमध्ये या बिर्याणीच्या नामांकित शाखा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र, ज्या मुख्य शाखेतून संपूर्ण ब्रँडचे नाव चालते, त्याच मुख्य हॉटेलमध्ये अन्नाचा असा दर्जा आणि इतकी कमालीची अस्वच्छता पाहायला मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर घटनेनंतर माध्यम प्रतिनिधींनी हॉटेल प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी आणि त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी हॉटेल मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉटेल मालकाने कॅमेऱ्यासमोर किंवा माध्यमांशी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.