ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Dharashiv ZP Election 2026: राज्यात सध्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांचा प्रचार रंगात आला असून बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारसभांमधून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. अशातच राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी थांब तुझी चौकशी लावतो म्हणत विरोधी उमेदवाराला जाहीर सभेत दम दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
तानाजी सावंत यांची विरोधी उमेदवाराला दमदाटी
“थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो,” अशा शब्दांत राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला जोरदार दम भरला. धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवारावर थेट टीका केली. सभा स्थळी येताना रस्त्यांच्या दुरवस्थेवरून संताप व्यक्त करत, जनतेला वेठीस धरू नका असा इशारा त्यांनी दिला.
Chandrapur News: चंद्रपूर महापौर पदाचा तिढा अखेर सुटला! धानोरकर की वडेट्टीवार गटाची सरशी?
आज रस्त्यांची काय अवस्था करुन ठेवली आहे? मी आत्ता रस्त्यावरुन आलो. तो रस्ता मी केला असं सांगत आहे. तुझ्या बापाने निधी आणला का? महाराष्ट्र सरकारचा पैसा, निधी मी आणला. थांब तुझी चौकशीच लावतो. माझा नाद करायचा नाही, मी मी म्हणणाऱ्यांची मी जिरवली आहे. महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे, हा तर फक्त जिल्हा परिषद गट आहे, असा दमही तानाजी सावंत यांनी यावेळी दिला. आपलाच जुना कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने तानाजी सावंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
उपमुख्यमंत्र्यांचा धाराशिव दौरा
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे धाराशिवमधील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे जाहीर सभा होणार आहे. दुपारी बारा वाजता सभेला सुरुवात होणार असून एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री प्रताप सरनाईक इतर शिवसेना नेते या सभेसाठी उपस्थित असणार आहेत.