मुंबई, ता. 24: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राबविले जाणारे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असताना धारावीकरांचा उदंड प्रतिसाद दिसून येत आहे. स्थानिकांच्या शंकांचे निरसन कारणासाठी सुरू करण्यात आलेल्या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात कॉल्स येत असून, काही कारणास्तव सर्वेक्षणातून वगळलेले किंवा सहभागी न झालेले रहिवासी या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत.
हेल्पलाईन क्रमांकावर गेल्या महिन्याभरात आलेल्या एकूण 700 कॉल्सपैकी सुमारे 41% कॉल्स हे सर्वेक्षणविषयी आहेत. घराचे सर्वेक्षण केव्हा होणार? घरावर क्रमांक कधी टाकणार? सर्वेक्षणासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? पूर्वी सहभागी न झालेल्यांना आता सर्वेक्षणात सहभागी होता येईल का? अशा स्वरूपाचे प्रश्न या कॉल्सच्या माध्यमातून स्थानिकांनी विचारले.
Symbiosis - NMDPL Skill development program: धारावीतील तरुणांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण
धारावीतील 13 कंपाऊंड, कुंभारवाडा, खासगी जमिनीवरील काही सदनिका आणि इतर ठिकाणच्या काही सदनिकाधारकांनी अद्याप सर्वेक्षणात सहभाग घेतलेला नाही. मात्र, हेल्पलाईन क्रमांकाविषयी केलेल्या जनजागृती मोहिमेनंतर मिळालेल्या प्रतिसादातून, धारावी पुनर्विकास प्रकल्पात आपल्या हक्काचे घर मिळविण्याची लोकभावना प्रकर्षाने दिसून आली.
"सर्वेक्षणाला धारावीकरांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद लक्षणीय आहे. हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या एकूण कॉल्सपैकी निम्मे कॉल्स हे सर्वेक्षणाबाबत आहेत, यावरून पुनर्विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लोक किती उत्सुक आहेत, हे स्पष्ट होतंय. या प्रकल्पात सर्वांना घर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी सुरुवातीपासून आम्ही राबविलेले व्यक्तिकेंद्री पुनर्विकासाचे पारदर्शी धोरण अखेरपर्यंत कायम राहील, याची आम्ही ग्वाही देतो" अशी प्रतिक्रिया धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) अधिकाऱ्याने व्यक्त केली.
स्थानिकांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी, त्यांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी हा हेल्पलाईन क्रमांक यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा राज्य शासनाचा एक महत्त्वाकांक्षी विशेष प्रकल्प असून यातून सुमारे 10 लाख नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य साध्य करण्यात येणार आहे. दर्जेदार घरे, अद्ययावत पायाभूत सुविधा देतानाच धारावीची सामाजिक आणि आर्थिक वीण कायम राहील, याची दक्षता पुनर्विकासात घेतली जाणार आहे.
Dharavi Redevelopment Plan: धारावीमध्ये अपात्र वाणिज्यिकांना मिळणार व्यवसायाची संधी
दरम्यान, पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्रे यांसह नवीन घरांचा ताबा कधी दिला जाणार, असे प्रश्नही हेल्पलाईन क्रमांकावर धारावीकरांनी विचारले आहेत. तसेच, पुनर्विकासानंतर घर कुठे मिळणार, घरांचे क्षेत्रफळ किती असेल, वरच्या मजल्यावरील सदनिकांना क्रमांक कधी देणार असेही प्रश्न हेल्पलाईवर विचारण्यात आले.