धारावी ते बॉलिवूड, जमील शाह! ज्याने तयार केलेल्या बुटांवर थिरकते बॉलिवूड

Mumbai News: जमीलपुढे नवी अडचण उभी राहीली ती म्हणजे डान्ससाठी लागणाऱ्या शूजची. आयात केलेल्या चांगल्या डान्स शूजची किंमत जवळपास आठ हजार रुपये होती

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:

दिव्या तलवार

मुंबईच्या धारावीमधील अरुंद गल्लीबोळांमध्ये अनेक स्वप्ने जन्माला येतात, बघता बघता ती गगनाला गवसणी घालतात. अशाच काही स्वप्नांचा चेहरा बनलाय जमील शाह. डान्सची प्रचंड आवड असलेल्या जमीलने बूट तयार करता करता एक स्वप्न बघितलं आज, त्याच स्वप्नांमुळे आज त्यानेही गगनाला गवसणी घातली आहे. जमीलने धारावीच्या फक्त दहा बाय दहा फूटाच्या छोट्याशा वर्कशॉपमध्ये भारतात डान्स शूजच्या संकल्पनेला नवा आकार देण्याचे काम केले. आज तो बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांचा विश्‍वासार्ह बूट कारागीर बनला आहे.  त्याची कहाणी म्हणजे धारावीच्या संयम, सभ्यता आणि न अपार क्षमतांचे जिवंत प्रतीक आहे.

बॉलिवूडवरील प्रेम आणि मुंबईपर्यंतचा प्रवास

जमीलचा प्रवास बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील डोघरा नावाच्या छोट्या गावातून सुरू होतो. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जमीलला लहानपणापासून शिक्षणाची ओढ होती. पण गरिबीने त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं. अवघ्या 13 व्या वर्षी त्याने घर सोडलं आणि दिल्लीला जाऊन एका कारखान्यात पट्टे व पाकिटं तयार करण्याचं काम करण्यास सुरुवात केली. तिथलं जगणं खडतर होतं. एके दिवशी एका सेलिब्रिटीचं मोठालं पोस्टर पाहून त्याच्या मनात बॉलिवूडचं स्वप्न रुजलं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जमील मुंबईत पोहोचला. धारावीतल्या एका चामड्याच्या कारखान्यात त्याला काम मिळालं. चामड्याचा वास, हातोड्यांचे आवाज, आणि हाताशी लागलेली साधनं यांच्यातच त्याच्या नशिब घडू लागलं.  

Advertisement

धारावीत काम करत असतानाच त्याच्या नजरेस एका वृत्तपत्रात आलेली डान्स क्लासची जाहिरात पडली. त्याने प्रसिद्ध कोरिओग्राफर संदीप सोपारकर यांच्याशी संपर्क साधला. “माझ्याकडे पैसे नाहीत, पण मला डान्स शिकायचा आहे,” असं त्याने प्रांजळपणे सांगितलं. त्याच्या प्रामाणिकपणाने भारावून जाऊन संदीप सोपारकरांनी कोणत्याही शुल्काशिवाय त्याला क्लासमध्ये प्रवेश दिला. मात्र जमीलपुढे नवी अडचण उभी राहीली ती म्हणजे डान्ससाठी लागणाऱ्या शूजची. आयात केलेल्या चांगल्या डान्स शूजची किंमत जवळपास आठ हजार रुपये होती, जी जमीलच्या आवाक्याबाहेर होती. संदीप सोपारकरांनी  त्याला 15 हजार रुपयांचे डान्स शूज दिले आणि तसेच शूज तयार करण्यास सांगितले.  

Advertisement

हे एक आव्हानच होतं, मात्र जमीलने ते पेललं. त्याने बुटांचा बारकाईने अभ्यास केला आणि त्याने पहिला मेड इन इंडिया डान्स शूज बनवला. हा शूज तयार करण्यासाठी त्याने विदेशी डान्स शूजचा शेप कसा आहे, त्याची शिवण कशी आहे, सोल कसा आहे, तो घालताना पायाला त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घेतलीय याचा अभ्यास केला होता.  

Advertisement

‘जमील शूज' बनली धारावीची नवी ओळख

प्रयोग म्हणून सुरू झालेलं या कामाने हळूहळू मोठं रुप धारण केलं. जमीलने तयार केलेले बूट फक्त परवडणारे नव्हते, तर ते वापरासाठी फारच चांगले होते.  त्याला डान्सरच्या शरीराची, त्यावर पडणाऱ्या भाराची, आणि डान्सर्सना उत्तम कामगिरी करण्यासाठी कायकाय लागतं याची माहिती होती. शूज हे फक्त पादत्राणे नव्हते तर ते उत्तम पदलालित्यासाठीही गरजेचे होते.  भारतातील नामवंत कोरिओग्राफर टेरेन्स लुईस यांनीही जमीलचे खूप कौतुक केले आहे.  “जमील हा केवळ बूट बनवणारा माणूस नसून तो डान्सची बारीक-सारीक माहिती असलेला तज्ज्ञ आहे." डान्सर्सना काय हवं आहे याची त्याला माहिती असल्याने  तो कॅरेक्टर हील्सपासून फ्लॅमेंको, टॅप आणि जॅझ शूजपर्यंत विविध प्रकारचे बूट बनविणारा एकमेव कारागीर आहे. 

जमीलने प्रसिद्धी डोक्यात जाऊ दिली नाही

प्रसिद्धी मिळाल्यावरही जमीलने धारावी कधीच सोडलं नाही. आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीपैकी एका धारावीतील त्याच्या छोट्याशा वर्कशॉपमध्ये अजूनही तो काम करत असतो. जमीलने म्हटलंय की “मी शेवटपर्यंत इथेच राहू इच्छितो, धारावीच्या पुनर्विकासानंतर इथेच एक जागा मिळावी, अशी माझी इच्छा आहे ” धारावीला अनेकदा केवळ दारिद्र्याच्या नजरेतून पाहिलं जातं, पण ही जागा ही कल्पकतेची, कौशल्याची आणि स्वप्नांची खाण आहे. जमीलचं यश म्हणजे त्याचे उत्तम उदाहरण आहे. धारावीत प्रचंड प्रतिभा आहे, फक्त ती जोपासणं आणि त्याला चालना देणं आवश्यक आहे हे जमीलच्या उदाहरणावरून कळतं.

बॉलिवूडमध्ये जमीलची ओळख

जमीलच्या ग्राहक यादीत प्रियंका चोप्रा, काजोल, ऋतिक रोशन, मनीषा कोईराला, फराह खान अशी असंख्य नावे आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तो सांगतो, “एकदा प्रियंका चोप्राने मला मिठी मारून विचारलं, जमील, तू एवढे आरामदायक बूट कसे बनवतोस? मी असे कंफर्टेबल शूज अनेक वर्षांपासून शोधत होते.” जमीलचा मोबाईल बघायला मिळाला तर तुम्हाला त्यात माधुरी दीक्षितचाही नंबर सापडेल. ही सेलिब्रिटी मंडळी माझ्यावर विश्वास ठेवतात आणि माझ्यावर काम सोपवतात, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असं जमील सांगतो.  

धारावीचं स्वप्न

जमीलची कहाणी ही केवळ एका व्यक्तीच्या यशाची नाही. ती एक प्रेरणा आहे — धारावीच्या मनामध्ये असलेल्या हजारो शक्यतांचं भान देणारी. धारावीच्या कुशल कारागिरांनी आणि चैतन्यशील वातावरणाने नवउद्योजकतेचं बीज पेरलं आहे. जर शासनाने चांगल्या सोयी, शिक्षण आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच देऊ शकलं, तर धारावी हे नावीन्याचं केंद्र बनू शकतं.

कल्पना करा अशी धारावी, जिथे जमीलसारखे अनेक युवक केवळ जगण्यासाठी नव्हे तर यशस्वी होण्यासाठी स्वप्नं पाहतील. जिथे परिस्थिती नव्हे तर सामूहिक पाठबळ आणि दूरदृष्टी ही त्यांच्या यशाची कारणं ठरतील.

जमील शाहने तयार केलेले बूट घालून जेव्हा डान्सर आपली कला सादर करतात तेव्हा त्यातून जमीलने पाहीलेली असंख्य स्वप्नेही जगासमोर येत असतात.  जमीलने तयार केलेल्या बूट हे   बॉलिवूडचे कलाकार जेव्हा माझे बूट घालून डात्याच्या बुटांवर नाचतात, तेव्हा धारावी त्याच्या आत्म्यात घट्ट बसलेली असते. "पैसा हा क्षणिक आहे, पण सन्मान, विश्वास आणि जिव्हाळा या चिरंतन सोबत राहणाऱ्या गोष्टी आहेत असं जमीलचं म्हणणं आहे.  

Topics mentioned in this article