धवेली हे लातूर जिल्ह्यातील एक गाव आहे. मात्र या गावात अजूनही स्मशानभूमी नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात मोठी अडचण निर्माण होते. खाजगी जागेत कुणी ते करू देत नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर आहे. त्यात गावात एका व्यक्तीचे निधन झाले. अशा वेळी गावकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता ते रस्त्याच्या शेजारी ठेवले. ही गोष्ट वाऱ्या सारखी प्रशासना पर्यंत पोहोचली त्यानंतर प्रशासनाला जाग आली. या आंदोलनाची चर्चा संपुर्ण जिल्ह्यात सध्या सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धवेली इथं स्मशानभूमीसाठी जागा नाही. अशात गावात एका व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला होता. त्याच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करायचे होते. मात्र स्मशानभूमीच नाही तर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर होता. पहिले ज्या खाजगी जागेत अंत्यसंस्कार केले जायचे त्या मालकाने आता आपली जागा वापरण्यास मनाई केली होती. त्यामुळे गावकऱ्यांची अडचण झाली होती. त्यामुळे अंत्यसंस्कार करता येत नव्हते.
अशा वेळी गावकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला मृतदेह ठेवला. शिवाय रस्त्याच्या कडेला बसून सर्वांनी गावाला स्मशानभूमीसाठी जागा द्या अशी मागणी केली. त्यासाठी त्यांचे हे आंदोलन होते. स्मशानभूमीसाठी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. पण त्यांची प्रशासनाने कधीच दखल घेतली नाही. अशा वेळी गावकऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच कात्रीत पकडले. मृतदेह थेट रस्त्या शेजारी ठेवला. प्रशासनाला याची माहिती दिली.
जोपर्यंत प्रशासन अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा देत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करायचे नाहीत अशी भूमीका गावकऱ्यांनी घेतली. गावकऱ्यांच्या या भूमीकेमुळे प्रशासनाचीही अडचण झाली. त्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शिवाय दहा दिवसात स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न मार्गी लावू असं सांगण्यात आलं. गावकऱ्यांनीही प्रशासनाच्या आश्वसानावर विश्वास ठेवला. त्यानंतर त्या मृतदेहावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.