चंदू चव्हाण हे नाव सर्वांनाच माहित आहे. चंदू चव्हाण यांनी भारत पाकिस्तान सीमेवर तैनात असताना भारतीय हद्द क्रॉस करत पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर ते चर्चेत आले होते. मात्र त्याचा त्यांना चांगलाच फटका बसला. त्यांना भारतीय सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं. आपल्याला सेवेत घेतलं जावं यासाठी त्यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांची अनेक वेळा भेट घेतली. त्यांना निवेदनं दिली. पण त्यावर काही झाले नाही. पण आता ते वेगळ्याच कारणासाठी महानगरपालिका कार्यालयात गेले होते. तिथे मात्र त्यांना चक्क धक्काबूक्की करण्यात आली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनेक दिवसांपासून चंदू चव्हाण हे धुळे महानगरपालिकेच्या चकरा मारत आहेत. त्याला कारण आहे त्यांच्या परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य. या संदर्भात ते वारंवार मनपाकडे पाठपुरावा करून देखील त्यांच्या परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या चंदू चव्हाण यांनी आज अखेर महापालिका आयुक्त यांच्या दालना बाहेर जोरदार आंदोलन केले. त्यांच्या आंदोलना वेळी अनेक जण जमा झाले होते. शिवाय महापालिकेचे काम कसं सुरू आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते करत होते.
चंदू चव्हाण यांना आयुक्तांच्या केबिन समोरून हटवण्यासाठी मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रसाद जाधव व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी युवराज खरात तिथे आले. त्यांनी त्यांना थेट मारहाण केल्याचा आरोप चंदू चव्हाण यांनी केला आहे. ही मारहाण होत असताना त्यांनी एक व्हिडीओ शुट केला आहे. या व्हिडीओत त्यांना धक्काबुक्की होताना दिसत आहे. आधी त्यांना लाथ मारली नंतर धक्का मारताना या व्हिडीओत दिसत आहे. एका माजी सैनिकाला अशी वागणूक दिली जाते असं चंदू चव्हाण त्या व्हिडीओत दिसत आहेत.
मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यावर आता संबंधीत कर्मचाऱ्यांवर काही कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंदू चव्हाण या जवानाचं नाव सर्वांनाच माहित असेल. हा मुळचा धुळे जिल्ह्यातील आहे. याच चंदू चव्हाण यानं भारत पाकिस्तान सीमेवर तैनात असताना भारतीय हद्द क्रॉस करत पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. शिवाय तो 3 महिने 21 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होता. भारत सरकारने केलेल्या प्रयत्नानंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली होती. ज्या वेळी तो धुळ्यात परत आला होता त्यावेळी त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. मात्र पाकिस्तानातून सुटण्याचा त्याचा आनंद जास्त काळ राहीला नाही. त्याला सैन्यदलातून बडतर्फ करण्यात आलं.