नागिंद मोरे
डी मार्टमध्ये खरेदीसाठी अनेक ठिकाणी आपण झुंबड उडालेली दिसते. पण धुळे शहरातील डी मार्ट मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनिकेत बिरारी या ग्राहकाने गुड डे बिस्किट खरेदी केले होते. त्यानंतर ते घरी गेले. हे बिस्कीच घरी गेल्यानंतर खाण्यासाठी काढण्यात आले. तर त्यांच्या मुलीने आणि पत्नीने ते बिस्किट खाल्ल्यानंतर त्या बिस्कीटमध्ये बुरशी लागलेली त्यांना जाणवले. शिवाय त्यात अळ्या ही आढळून आल्या. यासंदर्भात अनिकेत बिरारी यांनी धुळे येथील अन्न औषध प्रशासन गाठत डी मार्ट संदर्भात तक्रार केली आहे. तसेच धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील लेखी तक्रार केली आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डी मार्ट व संबंधित बिस्कीट कंपनीच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
धुळे शहरात असलेल्या डी मार्ट येथून आणलेल्या गुड डे बिस्किट पुड्यात चक्क अळ्या आढळल्याचा प्रकार घडला आहे. धुळ्यातील अनिकेत बिरारी यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. अनिकेत बिरारी यांनी शहरातील डी मार्ट मधून अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या. त्यामध्ये गुड डे बिस्किट देखील खरेदी केले होते. ते घरी आल्यानंतर त्यांच्या मुलीने ते बिस्कीट खाल्ल्यानंतर अनिकेत बिरारी यांच्या पत्नीला बिस्कीट पॅकेटमध्ये बुरशी लागली असल्याचे दिसले. शिवाय त्यात अळ्या झाल्याचेही त्यांना दिसून आले.
नामांकित कंपनी असलेल्या गुड डे बिस्किट पॅकेटमध्ये अळ्या निघाल्याने अनिकेत बिरारी हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी धुळ्यातील अन्न औषध प्रशासनाकडे डी मार्ट व संबंधित बिस्किट कंपनी विरोधात कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे. औषध प्रशासनाने त्यांना सांगितले की तुम्ही ऑनलाइन तक्रार करा त्यानंतर मुंबई येथील एक टीम पाहण्यासाठी येईल. त्यानंतर पुढील कारवाई होईल असं ही त्यांना अन्न व औषध प्रशासनाने सांगितलं आहे.
शिवाय आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही असे अजब उत्तर ही अन्न औषध प्रशासनाच्या वतीने संबंधित ग्राहकांना देण्यात आले आहे. अनिकेत बिरारी यांनीच ही माहिती दिली आहे. परंतु आता अन्न औषध प्रशासन आणि धुळे जिल्हाधिकारी या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेतात का हे पहावं लागणार आहे. शिवाय याबाबत धुळे डी मार्ट बरोबर याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण येवू शकले नाही. त्यामुळे या पुढे कारवाई होणार की नाही याकडेच बिरारी कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.