Who is Bhausaheb Maruti Talekar: द सर्जिकल स्ट्राइक फेम दिग्दर्शक आदित्य धरचा धुरंधर हा धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे ज्यामध्ये तगड्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद यावर आधारित धुरंधरमध्ये जबरदस्त एक्शन ड्रामा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरुन हा सत्य कथेवर आधारित असावा अशी शक्यता आहे. ही कथा भाऊसाहेब तळेकर यांची असावी असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमके कोण होते भाऊसाहेब तळेकर? काय होती त्यांची शौर्यगाथा? वाचा....
भाऊसाहेब मारुती तळेकर हे अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावचे सुपुत्र. त्यांचा जन्म १ जून १९७८ रोजी झाला. भाऊसाहेब यांचे वडील मारुती व आई सीताबाई तळेकर यांना चार मुली तर भाऊराव हे एकुलते एक पुत्र. चार मुलींच्या पाठीवर पुत्ररत्न झाल्याने भाऊसाहेब हे घरात सर्वांचेच लाड झाले. भाऊसाहेब यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती.
'भल्लालदेव' दारू विकू लागला, खंब्यासाठी मोजावे लागतील 5 ते 7 हजार रुपये
वडिलांनी गावात रोजंदारी करत तर आई सीताबाई यांनी शेतावर मोलमजुरी करून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. भाऊराव तसे शाळेत हुशार होते. मात्र घरच्या गरिबीमुळे जास्त शिक्षण न घेता त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १९ फेब्रुवारी १९९७ रोजी भाऊसाहेब भरती झाले. बेळगावातच सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिली नियुक्ती काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील नौसेरामध्ये झाली.
काश्मिरमधील राजौरी हा अतिशय थंड हवामान आणि जंगलाने वेढलेला परिसर. उंच टेकड्या, घनदाट जंगल यामुळे या भागात अतिरेक्यांनी सहारा घेतला होता. या अतिरेक्यांना शोधण्याचे मोठे आव्हान भाऊसाहेब तळेकर यांच्यासह त्यांच्या टीमपुढे होते. हे मोठे आव्हान पेलत भाऊसाहेब यांनी आपल्या सैन्यातील सेवेचा श्रीगणेशा केला. मात्र यातच त्यांना वीरमरण आले.
नक्की वाचा: सत्य घटनांवर आधारीत आहे 'धुरंधर', रिलीजनंतर पाकिस्तानची आणखी लाज जाण्याची शक्यता
भाऊसाहेब मारुती तळेकर हे मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे सैनिक होते ते जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात अशोक लिसनिंग पोस्टवर २७ फेब्रुवारी २००० रोजी ड्युटीवर होते. त्यांच्यासोबत अजून सात जवान सुद्धा ड्युटीवर होते तेव्हा अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात इलियास कश्मीरी याच्या नेतृत्वाखाली हुजी अतिरेक्यांनी भाऊसाहेब मारुती तळेकर यांचा शिरच्छेद केला तसेच त्यांचे शीर घेऊन लाइन ऑफ कन्ट्रोल (L.O.C) पलीकडे पाकिस्तानमध्ये घेऊन गेले. इलियास काश्मिरी याने तळेकर यांचे शीर हातात घेऊन जल्लोष केल्याचेही समोर आले होते.
दरम्यान, एकुलता एक पुत्र गमावल्याने तळेकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या घटनेनंतर सैन्याने त्याच्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांच्या कुटुंबाला दरमहा ₹ १०,००० पेन्शन मिळत आहे. तळेकरच्या कुटुंबाला भरपाई म्हणून १२ लाख रुपये देण्यात आले.