संकटमोचनांच्या मतदारसंघात भाजपच्या मातब्बर नेत्याला विरोधात उतरवणार? पवारांचा मोठा राजकीय डाव?  

भाजपच्या या नेत्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरविणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
जळगाव :

मंगेश जोशी, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष ताकतीने तयारीला लागले असून पक्ष फुटीमुळे झालेले सत्तांतर व सत्तांतरानंतरच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची झालेली पिछेहाट यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात शरद पवारांनी नवा राजकीय डाव आखला आहे. त्याची सुरुवात भाजपचे संकटमोचन गिरीश महाजन यांच्याच मतदारसंघातून करण्याचा निर्धार शरद पवारांनी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे .

भाजपच्या संकटमोचनांच्या मतदार संघात भाजपचे मातब्बर नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरविणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत दिलीप खोडपे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या संकटमोचकांविरोधात दिलीप खोडपे यांच्या माध्यमातून एक तगडं आव्हान उभे करण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसल्याचे बोलले जात आहे. 

नक्की वाचा - लोकसभा निवडणुकीतनंतर काँग्रेसला 'अच्छे दिन'; विधानसभेसाठी इच्छूकांची रांग

दिलीप खोडपे भाजपत नाराज, नाराजीतून दिलीप खोडपेंचा भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा 
दिलीप खोडपे हे जळगाव जिल्ह्यातील भाजपचे मातब्बर नेते मानले जातात. तसेच मराठा समाजाचे नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. जामनेर तालुक्यातील नेरी पळसखेडा गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातून दिलीप खोडपे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांकडून आग्रह होता. मात्र दिलीप खोडपे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जामनेर विधानसभा मतदारसंघातून दिलीप खोडपे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने गिरीश महाजनांच्या विरोधात दिलीप खोडपे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती.

मात्र पक्षात जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने निवडणूक लढवण्यासाठी नव्हे तर पक्षाचे लक्ष वेधण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज घेतल्याचे स्पष्टीकरण देत पक्षावर त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. दिलीप खोडपे यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. पक्षप्रवेशाबाबत दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांची देखील चर्चा केल्याची विश्वस्तनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. 

नक्की वाचा - शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीसाठी वेळ, MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं

गिरीश महाजनांसमोर दिलीप खोडपे यांच्या माध्यमातून राहणार तगडं आवाहन
जामनेर विधानसभा मतदारसंघ हा गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला मानला जातो. 30 वर्षापासून गिरीश महाजन हे सतत 6 वेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय गरुड यांना देखील गिरीश महाजनांनी भाजपमध्ये घेतल्याने गिरीश महाजन यांच्यासमोर विरोधकच नसल्याचे बोलले जात होते. मात्र भाजपचे मातब्बर नेते दिलीप खोडपे यांना गळाला लावून जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवार यांनी नवा राजकीय डाव आखला आहे. दिलीप खोडपे हे जिल्ह्यातील मराठा नेते म्हणून ओळखले जातात व जामनेर विधानसभा मतदारसंघात दीड लाख मराठा मतदान असल्याने ज्याचा मोठा फायदा दिलीप खोडपे यांना होवू शकतो. त्यामुळे शरद पवारांचा हा डाव भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्यासाठी मात्र मोठं संकट निर्माण करणारं असून दिलीप खोडपे यांच्या माध्यमातून एक तगडं आवाहन गिरीश महाजन यांच्यासमोर असणार आहे.