जाहिरात

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीसाठी वेळ, MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं

शरद पवारांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं की, राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीसाठी वेळ,  MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत पत्र लिहिलं आहे. शरद पवार यांना मुख्यमंत्र्यांकडे याबाबत भेटीसाठी वेळ देखील मागितली आहे.  

शरद पवारांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं की, राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.

पत्रात काय म्हटलं आहे?

महाराष्ट्र राज्यात 32 लाखाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने अहोरात्र अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया वेळेवर व्हावी तसेच वेळेवर नियुक्त्या मिळाव्यात हीच एकमात्र अपेक्षा असते. परंतु सद्यस्थितीत रखडलेल्या नियुक्त्या, अनेक परीक्षांच्या प्रलंबित असलेल्या जाहिराती, परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यास होत असलेला विलंब यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे विद्यार्थ्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत 

1. ऑगस्ट 2024 मध्ये नियोजित असलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या दिवशी IBPS परीक्षा येत असल्याने राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलावी तसेच राज्यसेवेच्या परीक्षेत कृषीच्या 258 जागांचा समावेश करावा या मागण्यांसाठी पुणे येथे स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असता आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु परीक्षा पुढे ढकलत असताना परीक्षा नेमकी कधी घेण्यात येईल याबाबत तसेच कृषी सेवेच्या जागांबाबत स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले नव्हते. आज जवळपास तीन आठवडे उलटूनही आयोगाने परीक्षेची तारीख घोषित केलेली नाही तसेच कृषीच्या जागांसंदर्भात देखील निर्णय घेतलेला नाही. ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने या संदर्भात त्वरित निर्णय घेण्यात यावा. 

2. संयुक्त पुर्व परिक्षा (गट-ब, गट-क) दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात आयोजित होते. परंतु यंदा सदरील परिक्षेसंदर्भात अद्यापही काहीही ठोस प्रक्रिया करण्यात आलेली नाही. तरी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदरील परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. तसेच सदरील परीक्षेच्या जाहिरातीत विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेल्या पदांची वाढ करण्यात यावी.

3. राज्यसेवा, कृषी सेवा, पोलिस उपनिरिक्षक, विक्रीकर सहाय्यक वगैरे सरळ सेवेतील अनेक पदांवर निवड होऊन बराच कालावधी उलटूनही पात्र उमेदवारांना नियुक्त्त्या मिळालेल्या नाहीत तरी रखडलेल्या नियुक्त्यांचा आढावा घेऊन पात्र विद्यार्थ्यांना त्वरित नियुक्ती आदेश द्यावेत. 

4. लिपिक पदांकरीता 7000 हून अधिक जागांची भरती यासह काही अन्य भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणांत अडकलेल्या आहेत, त्यावर त्वरित निर्णय घ्यावा. 

5. राज्यात शिक्षक तसेच प्राध्यापकांच्या देखील बहुतांश जागा रिक्त असल्याने रिक्त जागांचा नव्याने आढावा घेऊन शिक्षक भरती तसेच प्राध्यापक भरतीला देखील गती द्यावी. 

राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून यासंदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपली वेळ मिळावी यासाठी मी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील आहे, परंतु अद्यापही आपली वेळ मिळालेली नाही. वाढत्या बेरोजगारीमुळे तरूणवर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता असून प्रसंगी आंदोलनाची भुमिका घेऊन देखील त्यांच्या मागण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही होत नसल्याने हा विषय अधिक संवेदनशील झाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून तातडीने वेळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
काँग्रेस आमदार पोहोचला, पाठोपाठ अजित पवारही पोहोचले; 'सागर' वरील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीसाठी वेळ,  MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं
maratha-obc-reservation-maharashtra-manoj-agitation-laxman-hake-protest-antarwali-sarati
Next Article
उपोषणाचा विरोध उपोषणाने, अंतरवालीत जरांगे विरूद्ध हाके आमनेसामने येण्याची शक्यता